बेळगाव / प्रतिनिधी

जवान देशसेवेचे कर्तव्य बजावतात  तर जगाचा अन्नदाता (पोशिंदा) असलेले शेतकरी हे जनतेच्या उदरनिर्वाहासाठी शेतात काबाडकष्ट करतात. तेव्हा जवान आणि शेतकरी  या दोघांनीही संस्थेसाठी एकदिलाने काम करावे, असे आवाहन व्यंकटेश्वर पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग,लि. नाशिकचे चेअरमन शिवाजी ढोले यांनी केले.

बेनकनहळ्ळी रोड, बेळगुंदी क्रॉस येथे व्यंकटेश्वर पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग,लि. नाशिक या संस्थेमार्फत सहकार क्षेत्राच्या माध्यमातून बेळगावसह परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रतिदिन २० ते ३० टन काजू प्रोसेसिंग क्षमता असलेला प्रकल्प उभारला जात आहे. या ठिकाणी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, सुमारे  ३ ते ४ महिन्यात हा प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, त्यानुसार या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. दोन महिन्यांपूर्वी निवृत्त लेफ्टनंट जनरल दिलीप देसाई यांनी या प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. अवघ्या दोन महिन्यातच शानदार प्रकल्प पूर्णत्वास येत असून याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून कर्नाटक राज्यात सहकार क्षेत्रातून शेतकऱ्यांसाठी महान कार्य होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. त्यासाठी या प्रकल्पाची अशीच यशस्वी वाटचाल होऊ दे अशी परमेश्वर चरणी त्यांनी प्रार्थना केली.

सहकार क्षेत्राच्या माध्यमातून कर्नाटकात शेतकऱ्यांसाठी व्यवसाय - उद्योगांच्या निर्मितीसाठी सन २०२० मध्ये या संस्थेने बेळगावात पहिले पाऊल टाकले आणि येथील शेतकऱ्यांविषयी माहिती घेण्यास सुरुवात केली. तेव्हा येथे काजू पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते अशी माहिती येथील शेतकऱ्यांनी दिली होती. परंतु काजू पीक मोठ्या प्रमाणात घेऊन देखील योग्य हमीभाव मिळत नसल्याचा मुद्दा शेतकऱ्यांनी उपस्थित केला होता. यावेळी पुढील दोन ते तीन वर्षात सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काजू प्रोसेसिंग युनिट उभारण्याची ग्वाही शेतकऱ्यांना दिली होती. यासाठी शेतकऱ्यांनी संस्थेचे सभासद व्हावे असे आवाहन केले होते. त्या आव्हानाला प्रतिसाद देत  शेतकऱ्यांनी संस्थेवर विश्वास ठेवला आणि सभासद नोंदणी सुरू केली आणि आज दोन ते अडीच वर्षात २०  हजारांपेक्षा अधिक  शेतकरी संस्थेचे सभासद आहेत याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. याशिवाय संस्थेला सहकार्य करणाऱ्या निवृत्त जवान आणि शेतकऱ्यांनाही त्यांनी धन्यवाद दिले.

व्यंकटेश्वर पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लि. नाशिक ही कृषी क्षेत्रातील एक सहकारी संस्था आहे. सहकार क्षेत्रात पदार्पण करताना नाशिकमध्ये या संस्थेने आपली मुहूर्तमेढ रोवली. सध्या नाशिक मालेगाव येथे ५२८ एकर ३१ गुंठे जागेत मत्स्य, डेअरी हळदी यासह एकूण १२ ते १३ प्रकल्पांचे काम सुरू आहे. संस्थेच्या माध्यमातून देश - विदेशात मालाची निर्यात होत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी निवृत्त लेफ्टनंट जनरल दिलीप देसाई यांच्यासह  निवृत्त लष्करी अधिकारी आणि स्थानिक शेतकरी उपस्थित होते.