• नगरसेवकांची मागणी : अधिकाऱ्यांच्या बदल्या न झाल्याने नगरसेवकांमध्ये नाराजी 
  • महापालिका कौन्सिल सभागृहात महापौरांच्या नेतृत्वाखाली झाली बैठक 

बेळगाव  / प्रतिनिधी 

बेळगाव महापालिकेत गेली कित्येक वर्षे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या न झाल्याने नगरसेवकांमध्ये नाराजी आहे.अधिकाऱ्यांच्या बदल्या होत नसल्याने पालिकेचा विकास खुंटला असल्याचे सांगून नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. 

महापालिकेच्या कौन्सिल सभागृहात शुक्रवारी महापौरांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. या बैठकीत बेळगाव महापालिकेचे नगरसेवक शेखर डोणी यांनी शासन आदेशानुसार दर तीन वर्षांनी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची मागणी केली. तत्पूर्वी जिल्हा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जनतेने अधिकाऱ्यांविरोधात रोष व्यक्त केला. ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत, त्यांची यादी यापूर्वीच महापौरांना देण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून येथे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा प्रस्ताव महापौरांनी ठराव घेऊन पास करावा शासनाकडे पाठवावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली. दरम्यान या बैठकीत बोलताना महापौर शोभा सोमनाचे म्हणाल्या, तीन वर्षांपासून महामंडळात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी नगरसेवकांच्या मागणीनुसार महापालिकेत ठराव घेऊन शासनाकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे सांगितले. 

या बैठकीत स्मार्टसिटीच्या कामाबाबत सविस्तर चर्चा झाली. बेळगाव स्मार्टसिटीच्या अधिकाऱ्यांचे काम चांगले नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून त्यांनी कधीच काम केले नाही. स्मार्टसिटी आणि महापालिकेचा काही संबंध आहे की नाही,असा प्रश्न भाजपचे सदस्य रवी धोत्रे  यांनी उपस्थित केला. तर सत्ताधारी गट नेते राजशेखर डोणी म्हणाले की, स्मार्ट सिटीचे काम पूर्णपणे अशास्त्रीय आहे. एकदा बांधलेला काँक्रीटचा रस्ता विविध कारणांनी खोदला जातो.  हे केव्हा संपणार जनतेला माहित नाही. स्मार्टसिटीच्या अशा पद्धतीच्या कामाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्मार्टसिटी आणि सार्वजनिक बांधकाम विभागासह महापालिकेची स्वतंत्र बैठक घेण्यात यावी, असा आग्रह सदस्यांनी धरला.स्मार्टसिटी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांबाबत मनपाची चार दिवसांत बैठक घेऊन चर्चा करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे महापौर शोभा सोमनाचे यांनी सांगितले. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी आपल्या प्रभागातील समस्यांबाबत नगरसेवकांनी लिहिलेल्या पत्रांची उत्तरे १५ दिवसांत दिली जातील, असे सांगितले. याशिवाय सर्व कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली.

स्मार्टसिटीचे विद्युत अभियंता आनंद देशपांडे म्हणाले की, स्मार्टसिटीतून सात वर्षांत एलईडी विद्युत दिवे बसविण्याचे काम देण्यात आले आहे. त्याची वेळीच अंमलबजावणी न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी उपमहापौर रेश्मा पाटील, महापालिका अधिकारी लक्ष्मी सुळगेकर, भाग्यश्री हुग्गी आदी उपस्थित होते.

- नगरसेवक नितीन जाधव यांचा त्रिभाषा धोरणाचा प्रस्ताव महापौरांकडून मंजूर


महापालिकेत होत असलेल्या गलथान कारभाराच्या विरोधात नगरसेवक एकवटले. शुक्रवारी (दि. २१ जुलै) रोजी महापालिकेत बैठकीवेळी नगरसेवक नितीन जाधव यांनी महापौरांकडे, नोटीस आणि एजेंडासाठी त्रिभाषा धोरणाचा प्रस्ताव ठेवला आणि त्यानुसार महापौरांनीही तो मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार सर्व नगरसेवकांना नोटीस आणि एजेंडाचे कागदपत्रे कन्नड, इंग्रजीसह, मराठीतूनही दिले पाहिजेत असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. मराठीतून कागदपत्रे देण्यात येत नाहीत. त्यामुळे नगरसेवक नितीन जाधव यांनी पुढाकार घेवून हे प्रस्ताव मांडला आणि सर्व नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा दिला.