- जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव / प्रतिनिधी
गृहलक्ष्मी लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार योग्य ती तयारी करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली. महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
दि. १९ जुलै रोजी सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या नोंदणी प्रक्रियेला चालना देण्यात येणार आहे. यानंतर संपूर्ण राज्यभरासह बेळगाव जिल्ह्यातही गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थी नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
सरकारच्या निर्देशानुसार राज्यातील ग्राम वनकेंद्र आणि शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नोंदणी प्रक्रिया केली जाणार आहे. जिल्ह्यातील रेशन कार्ड आणि महिला घरमालक असल्याची माहिती यापूर्वीच संकलित करण्यात आली आहे. लाभार्थ्यांची नोंदणी सुरळीत होण्यासाठी संगणक, इंटरनेट कनेक्शन, पर्यायी वीज जोडणी यासह आवश्यक ती सर्व तयारी अधिकाऱ्यांनी करावी अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली.
तत्पूर्वी महिला बालकल्याण व ज्येष्ठ नागरिक सबलीकरण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. गृहलक्ष्मी योजना लाभार्थी नोंदणी प्रक्रिया १९ जून रोजी सायंकाळी ५ नंतर सुरू होणार आहे. नोंदणीसाठी येणाऱ्या लाभार्थ्यांची सोय करावी पावसाळा असल्याने रांगेत बसण्याची व्यवस्था, नोंदणी केंद्रांवर स्थानिक पीडीओ आणि ग्राम लेखापालांची नियुक्ती करावी तसेच प्रत्येक नोंदणी केंद्रांवर पर्यवेक्षक व पुरेशी सुरक्षा पुरविण्यात यावी यामुळे नोंदणी प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यास मदत होईल असे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, आयएएस अधिकारी शुभम शुक्ला, महिला व बालविकास विभागाचे उपसंचालक आर. नागराज यांच्यासह जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी जिल्हा नगर विकास कक्षाचे अधिकारी उपस्थित होते.
0 Comments