• श्रीशैल जगद्गुरु डॉ.चन्नसिद्धराम पंडित आराध्य शिवाचार्य महास्वामी यांची सदिच्छा 

बेंगळूर / वार्ताहर

"चांद्रयान - ३" मोहिमेचे यश निश्चित असून आपला राष्ट्रध्वज चंद्रावर फडकविला जाईल, असा दृढ विश्वास व्यक्त करत श्रीशैल जगद्गुरु डॉ.चन्नसिद्धराम पंडित आराध्य शिवाचार्य महास्वामी यांनी "चांद्रयान - ३" मोहिमेसाठी सदिच्छा व्यक्त केली आहे.

देशाच्या विविध प्रसिद्ध मंदिरांमध्ये झालेली पूजा-अर्चा, भारतीय अंतराळ विज्ञान संस्था अर्थात इस्रोचे सततचे प्रयत्न आणि अभिमानास्पद कामगिरीमुळे शुक्रवारी श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आलेले "चांद्रयान-३" यशस्वीरित्या लँडिंग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी आम्ही दररोज देवाकडे पूजा- अर्चा करून विशेष प्रार्थना करतो असेही त्यांनी सांगितले. भारत धर्मनिरपेक्ष देश आहे. येथे सर्वधर्मसहिष्णुतेच्या तत्त्वानुसार सर्व लोक राहतात. त्यामुळे "चांद्रयान - ३" प्रक्षेपणाच्या यशस्वीतेसाठी विविध जाती धर्मांतील लोकांनी आपल्या महत्त्वाच्या मंदिरांमध्ये पूजा केली, हे  कौतुकास्पद आहे. देशातील प्रत्येकाने जात-धर्म, पक्षभेद विसरून वैज्ञानिकांच्या सहसाला प्रोत्साहन दिले पाहिजे असेही ते म्हणाले.

यापूर्वी जेव्हा "चांद्रयान - २" मोहीम शेवटच्या टप्प्यात अपयशी ठरली, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  "हरू नका, विजयाकडे पाऊल टाका पुन्हा प्रयत्न करा". या शब्दात शास्त्रज्ञांना प्रोत्साहन दिले होते. परिणामी शास्त्रज्ञांनी तिसऱ्या चांद्रयान मोहिमेची तयारी केली आणि त्याचे प्रक्षेपण ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. तेव्हा सर्व जाती-धर्मांच्या लोकांनी ही मोहीम यशस्वी होण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करावी असे आवाहन त्यांनी केले.