- संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान : नागरिकांचे हाल
बेळगाव / प्रतिनिधी
मुसळधार पावसामुळे बळ्ळारी नाल्यासह बेळगाव शहरातील अनेक नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे शहर - उपनगरातील सखल भाग पाणी साचल्याने जलमय झाला आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची धडपड सुरू आहे.
गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात संततधार पाऊस पडत आहे. पावसामुळे बेळगावमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भागातील ओढे -नाल्यांना पूर आल्याने आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी घरात शिरल्याने घरातील संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.
अनेक नागरिकांनी आपल्या घरांना कुलूप लावून नातेवाईक व मित्रमंडळींकडे आश्रय घेतला आहे. बेळगावच्या वडगाव परिसरात अनेक घरे पाण्याखाली गेल्याने बंद आहेत. याशिवाय विशेषत: वॉर्ड क्रमांक ३ मध्ये घरांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांचे हाल होत आहेत. वॉर्ड क्रमांक ५० मधील संभाजीनगर, केशवनगर, गणेश कॉलनी, राघवेंद्र कॉलनी, अन्नपूर्णेश्वरीनगर येथील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. अर्ध्याहून अधिक विद्युत उपकरणे पाण्याखाली गेली असून घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे पंपसेट लावून घरातील पाणी बाहेर काढण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू आहे. घरात पाणी शिरल्याने नागरिकांवर संघर्ष करण्याची वेळ आली आहे.
दरम्यान, नगरसेविका सारिका पाटील यांनी पूरग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी नागरिकांशी चर्चा करून परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी लवकरच मदतकार्य सुरु करण्याचे आश्वासन दिले. वडगावप्रमाणेच अमननगरचीही हीच स्थिती आहे. या वसाहतीतील बहुतांश रहिवासी गरीब आहेत. छोटेसे घर बांधलेल्या या रहिवाशांची पावसाच्या पाण्याने बिकट स्थिती झाली आहे. पुराच्या पाणी रस्त्यावर आल्याने रस्ते पाण्याखाली गेले असून संपर्कात अडथळा निर्माण होत आहे. पाणी तुंबलेल्या रस्त्यावरून नागरिकांची ये - जा सुरू आहे.
0 Comments