• मंत्री सतीश जारकीहोळी ; काँग्रेस कार्यकर्त्यातर्फे निपाणीत सत्कार

निपाणी (प्रतिनिधी) : 

निपाणी मतदारसंघात काँग्रेसची सत्ता येण्यासाठी सर्वच कार्यकर्त्यांनी काम केले आहे. तरीही त्यांचा पराभव झाला. पण राज्यात काँग्रेसचे सरकार असून कुणीही खचून न जाता पुन्हा त्याचप्रमाणे काम करून भविष्यातील तालुका पंचायत जिल्हा पंचायत आणि लोक सभा निवडणुकीकडे आपले लक्ष आहे. त्यामध्ये काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. त्यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर प्रथमच निपाणी मतदारसंघाचे काँग्रेस कार्यकर्ते त्यांचा येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात सत्कार करण्यात आला. त्याला उत्तर देताना ते बोलत होते.

जारकीहोळी म्हणाले, सत्तेत आल्यानंतर लागलीच ५ आश्वासनांची पूर्तता केली. कॉंग्रेसचा भरवसा कार्यकर्तेच असून त्यांच्या कसोटीला सरकार खरे ठरणार आहे. भाजप कडून केवळ दिशाभूल करण्याचे काम होत आहे. सर्वांच्या सहकार्याने प्रलंबित कामे पूर्ण करणार असून कांहीनी भाजपाला निवडून देण्यासाठी काम केले. मात्र तेही आमच्या सोबत येतील. आगामी तालुका, जिल्हा पंचायत आणि लोकसभा निवडणुकीची जबाबदारी काकासाहेब पाटील यांच्या कडेच असेल. कार्य कर्त्यांची प्रशासकीय कामे कुठेही तटणार नाहीत. येत्या निवडणुकीत विजय आपलाच होईल.

विरकुमार पाटील म्हणाले, जिल्ह्या प्रमाणेच निपाणीचे पालकत्व मंत्री जारकीहोळी यांनी स्वीकारावे. सर्व जण पक्षाबरोबर एकनिष्ठ राहणारे कार्यकर्ते आहेत. गेल्या दहा वर्षात विरोधकांनी मोठा त्रास दिला. आता सूनेचे दिवस आले असून प्रत्येक गावात घरकुलांची स्वप्ने व्हावीत. पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम खाते दिले. ते मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

काकासाहेब पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निवडणुक लढविली. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढाईत आपणाला पराभव स्वीकारावा लागला. मात्र नेते मंडळी बरोबरच कॉंग्रेस सरकार आमच्या पाठीशी आहे. कार्यकर्त्यांनी खचू नये. कॉंग्रेस सत्तेत येण्यासाठी काम करु. कोणावरही अन्याय होवू देणार नाही. कार्यकर्त्यांना समतोल राखण्यासाठी शासन नियुक्तीची पदे देण्यात येतील. कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी सरकार मध्ये सहभाग आवश्यक आहे.

यावेळी चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, पंकज पाटील, राजेश कदम, राजेंद्र वडर, अण्णासाहेब हावले, सुमित्रा उगळे, बक्तीयार कोल्हापुरे, दादासाहेब जाधव, नजीर शेख, कृष्णा कांबळे, जरारखान पठाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध संघटनेतर्फे जारकीहोळी यांचा सत्कार झाला

कार्यक्रमास राजेंद्र चव्हाण, किरण कोकरे, विश्वास पाटील, रोहन साळवे,अल्लाबक्ष बागवान, बसवराज पाटील,विनोद साळुंखे, सुजय पाटील, अशोक आरगे, कॉ. चंद्रकांत खराडे, वैभव पाटील, बाबुराव खोत, विश्वास आबणे, धनाजी चव्हाण, नवनाथ चव्हाण, अस्लम शिकलगार, महादेव कौलापुरे, सचिन लोकरे, प्रतीक शहा, अवधूत गुरव, शशी पाटील, बबन निर्मळे, सुनील शेवाळे, भास्कर स्वामी, आप्पासाहेब पाटील, सुप्रिया पाटील, रोहिणी पाटील यांच्यासह निपाणी मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते. दीपक ढणाल यांनी सूत्रसंचालन केले.