• पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर काकतीनजीक दुर्घटना 
  • दोन सेवकांचा दुर्दैवी मृत्यू 

बेळगाव / प्रतिनिधी

कर्नाटक राज्य सरकारने धर्मांतर बंदी कायदा रद्द केल्याच्या विरोधात आज विश्व हिंदू परिषद - बजरंग दलाच्यावतीने बेळगावात आयोजित केलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या शिवापूर (ता. बेळगाव) येथील मुप्पीन काडसिद्धेश्वर मठाच्या काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या गाडीला पुणे - बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आज शनिवारी सकाळी १०.३० मि. सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात स्वामीजी गंभीर जखमी झाले तर त्यांच्या दोन सेवकांचा मृत्यू झाला. पंचाक्षरी बसय्या हिरेमठ (वय २६ ) रा.बनकनट्टी (ता. हुक्केरी) व  पांडुरंग मारुती जाधव (वय ७०) रा. कोल्हापूर अशी मृत सेवकांची नावे आहेत. 

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार राष्ट्रीय महामार्गावरील काकतीनजीक कॅन्टर, मालवाहतूक गाडी आणि स्वामीजींच्या कारची एकमेकांना धडक बसल्याने ही दुर्घटना घडली. 

अपघाताची माहिती मिळताच अपघाताची माहिती मिळताच काकतीचे पोलीस निरीक्षक विजय शिन्नूर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी भेट देऊन काडसिद्धेश्वर स्वामीजींना उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या स्वामीजींवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. अपघातात मृत्यू पावलेल्या स्वामीजींच्या दोन्ही सेवकांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत.