निपाणी (प्रतिनिधी) : शहराच्या पश्चिमेस असलेल्या बेळगाव नाक्याजवळील खरी कॉर्नर आझाद गल्ली येथे दुचाकीची एकाला धडक बसून अपघात झाला. या अपघातात  महंमदहनीफ दस्तगीर मुजावर (वय ६२रा. मिरज) यांचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री हा अपघात झाला. त्याची शहर पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली आहे. मयत मुजावर यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

अपघाताबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, मिरज मधील महमदहनीफ मुजावर हे महाराष्ट्र एसटी महामंडळात कोल्हापूर आगारात चालक म्हणून सेवेत होते. त्यांची मुलगी आझाद गल्ली येथे राहत असून ते गेल्या चार दिवसांपूर्वी आपल्या मुलीकडे आले होते. रात्री ते सेवा रस्ता पार करून जात असताना दुचाकीस्वार प्रशांत बाळासो पाटील ( रा. गव्हाण ) यांचा दुचाकी वरील ताबा सुटल्याने त्यांच्या दुचाकीची मुजावर यांना जोराची धडक बसली. या अपघातात मुजावर हे रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला  गंभीर इजा झाली. अपघातानंतर त्यांना तातडीने येथील सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण उपचारला साथ न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. 

याबाबत मयत मुजावर यांची मुलगी आफ्रिना अल्ताफ नाईक यांनी दुचाकीस्वारा विरोधात  शहर पोलीसात तक्रार दाखल केली आहे.