- चन्नमा चौकात निदर्शने करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
- विविध मागण्यांच्या पूर्ततेची मागणी
- जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले निवेदन
बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरु सेनेच्या वतीने आज बेळगावात तीव्र आंदोलन छेडण्यात आले. प्रारंभी कित्तूर चन्नम्मा चौकात निदर्शने करून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
बेळगाव जिल्ह्याला दुष्काळी जिल्हा म्हणून घोषित करावे, प्रति एकरी ५० हजार रु. पीक नुकसान भरपाई देण्यात यावी, मान्सूनला विलंब होत असल्याने पावसाअभावी उभी पिके शिवारात वाळून जात असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे पाणीटंचाई निवारणासाठी तातडीने उपाययोजना करावी अशा विविध मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत .
यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्य रयत संघाचे अध्यक्ष जुन्नाप्पा पुजारी म्हणाले, शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारची दुटप्पी भूमिका निषेधार्ह आहे. एकीकडे मोफत वीज देण्याचे आश्वासन देत दुसरीकडे वीज दरात प्रचंड वाढ करण्यात आली आहे. पावसाविना राज्यभरात पिके वाळली आहेत. परिणामी कृषी व्यवसाय तोट्यात चालला असून शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. बेळगाव जिल्ह्यातील सर्व धरणांच्या पाणी पातळीने तळ गाठला आहे. तेव्हा प्रत्येक गावात नागरिक आणि जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी तातडीने उपाययोजना राबवण्यात यावी. शेतकऱ्यांची कर्ज वसुली पूर्णपणे थांबवावी, ऊस उत्पादकांची थकबाकी तात्काळ द्यावी, साखर महामंडळात कर्मचाऱ्यांची कमतरता असून तातडीने भरती करावी तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी त्यांनी केली.
या मागण्या पूर्ण न झाल्यास शेतकरी आपले कुटुंब आणि जनावरांसह बेळगावात तीव्र आंदोलन छेडतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी सुरेश परगन्नवर, बसवराज बिचुरू, रमेश वाली,राघवेंद्र नायक आदी शेतकरी नेते उपस्थित होते.
0 Comments