बेळगाव / प्रतिनिधी
भोपाळ टी. टी. नगर स्टेडियमवर नुकत्याच संपन्न झालेल्या स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या १९ वर्षाखालील ६६ व्या राष्ट्रीय ॲथलेटिक स्पर्धेत बेळगांवच्या संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेचा माजी विद्यार्थी चैतन्य कारेकर याने मुलांच्या गटातील ११० मी.अडथळा शर्यतीत १४.४४ सेकंद इतकी वेळ नोंदवत सुवर्ण पदक पटकावले. सदर चमकदार कामगिरी करून बेळगावच्या नावलौकिकात भर घातल्याबद्दलसुवर्णपदक पटकाविल्याबद्दल त्याचा शाळेतर्फे आज सत्कार करण्यात आला.
संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, विद्याभारती बेळगाव जिल्हा अध्यक्ष माधव पुणेकर, संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, शाळेचे क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते चैतन्य कारेकर याला पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. तसेच त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी शर्वरी कारेकर, आशा कुलकर्णी, गीता वर्पे, विणाश्री तुक्कार, सविता पाटणकर, मयुरी पिंगट, अनुराधा पुरीसह शाळेचा शिक्षक वर्ग उपस्थित होता.
0 Comments