• जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची सूचना 
  • टास्क फोर्सची पिण्याच्या पाण्यासंदर्भात तातडीची बैठक

बेळगाव / प्रतिनिधी 

पावसाळा लांबल्याने बेळगाव जिल्ह्यातील काही भागात भीषण पाणी टंचाई  निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात  ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या असेल तिथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सर्व तहसीलदार व स्थानिक संस्थांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना दिल्या. नागरिक आणि पशुंना पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याबाबत करावयाच्या खबरदारीच्या उपाययोजनांबाबत आज सोमवारी (1९ जून) अधिकाऱ्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, सर्व तहसीलदारांनी स्वतःच्या मतदारसंघातील आमदारांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची बैठक घेऊन आवश्यक अनुदानाबाबत प्रस्ताव सादर करावा असे निर्देश त्यांनी तहसीलदारांना दिले.  

संबंधित तालुका किंवा मतदारसंघातील समस्येची छाननी आणि आपत्कालीन कामांसाठी आवश्यक असलेल्या अनुदानाचा प्रस्ताव तयार करण्यासाठी टास्क फोर्सची बैठक घेण्यात यावी. त्यावर आधारित वाढीव निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

उपलब्ध निधीत आमदारांच्या सल्ल्यानुसार कामे सुरू करावीत. लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी तातडीची कामे करण्यासाठी ग्रामीण पेयजल पुरवठा विभागात पुरेसे अनुदान उपलब्ध आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रामपंचायतींमध्ये अनुदान उपलब्ध असून, खासगी कूपनलिका उपलब्ध असल्यास ते तात्काळ भाडोत्री  घ्यावेत, असेही ते म्हणाले.

या बैठकीला जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व स्थानिक संस्थांचे प्रमुख उपस्थित होते.