हुक्केरी / वार्ताहर 

राष्ट्रीय महामार्गावर बेकायदेशीरपणे गांजा विक्री करताना दोन आरोपींना अटक करण्यात आली. हुक्केरी तालुक्यातील हत्तरगी टोल नाक्याजवळील हंचीनाळ गावच्या हद्दीत बेळगाव डीसीआरबी शाखेचे डीएसपी विरेश दोडमनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सीईएन गुन्हे पोलीस स्टेशन बेळगावचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व बेळगाव डीसीआरबी शाखेच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी महाराष्ट्रातील आहेत. 

साहेबराव विश्वनाथ पलीके, (वय ५०, रा. हळदाईवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) आणि पुरुषोत्तम रामचंद्र कौलगी (वय ४२, रा. पंढरपूर, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक केलेल्यांकडून सुमारे ६,००,०००/- किंमतीचा ४ किलो १८० ग्रॅम गांजा आणि वाहतुकीसाठी वापरलेली दुचाकी  जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी बेळगाव जिल्हा सीईएन गुन्हे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करून तपास सुरु करण्यात आला आहे. 

या कारवाईत पोलीस निरीक्षक बी.आर. गड्डेकर, डीसीआरबीचे एएसआय टी. के. कोळची,  ए. एन.मसरगुप्पी, व्ही. व्ही. गायकवाड आणि जिल्हा सीईएन गुन्हे पोलीस स्टेशनचे कर्मचारी एस.ए.बेवनूर, एन.आर.घाडेप्पनवर, एल.वाय.किलारगी आदींचा सहभाग होता.