- जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यासह शहर पोलीस उपायुक्त शेखर एस. टी. यांचाही सहभाग
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या १३ व्या फोन - इन कार्यक्रमाला जनतेतून लक्षणीय प्रतिसाद लाभला.
बेळगाव जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच जिल्हा प्रशासन, जिल्हा आणि शहर पोलीस विभागाच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या फोन इन कार्यक्रमात जनतेने दूरध्वनीद्वारे संपर्क करून आपल्या समस्या मांडल्या आणि त्या सोडवण्याची मागणी केली. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील, जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांच्यासह शहर पोलिस विभागाचे उपायुक्त शेखर एस.टी.अतिशय नम्रपणे जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्या सोडवण्याच्या दृष्टीने सकारात्मक प्रतिसाद दिला.
शहरातील एका व्यक्तीने फोन करून सांगितले की, महानगरपालिकेने बांधलेल्या समुदाय भवनामुळे लोकांना त्रास होत आहे. याबाबत कार्यवाही करावी, अशी तक्रार त्यांनी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे केली. त्यावर उत्तर देताना जिल्हाधिकाऱ्यांनी, पालिका आयुक्त येथे असून, त्यांना कळवून कारवाई केली जाईल, असे सांगितले.
अथणी तालुक्यातील एका व्यक्तीने जिल्हा पोलिस अधीक्षक संजीव पाटील यांना फोन करून तक्रार केली की, अथणीच्या काही भागात चार जण दारूची अवैध विक्री करत आहेत. त्यावर उत्तर देताना एसपींनी संबंधित पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करा, त्यांना तत्काळ अटक करणार असल्याचे सांगितले.
अथणी तालुक्यातील हनुमापूर गावातील मळ्यातील रस्ता शाळेकडे जातो. नवीन नकाशात रस्ता नसल्याचे दिसून आले. तो रस्ता आता जागेच्या मालकाने बंद केल्याची तक्रार त्यांनी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे केली. त्यावर उत्तर देताना जिल्हाधिकाऱ्यांनी, रस्ता नकाशावर आहे की नाही, याची तपासणी करून कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.
बेळगावच्या टिळकवाडीतील कलामंदिरात प्रतिबंधात्मक आदेश असतानाही स्मार्ट सिटी कंपनीने काम सुरू केले केल्याची तक्रार एका व्यक्तीने केली. त्यावर स्मार्ट सिटीला न्यायालयाच्या आदेश पालन करण्याची सूचना करण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
धारवाड जिल्ह्यातील एका वकिलाने फोन करून सांगितले की, अथणी महिला सहकारी संस्थेसह दोन्ही सोसायट्या जमा केलेले पैसे परत करत नाहीत. त्यामुळे ठेवीदारांना खूप त्रास होत आहे. आम्हाला आमचे पैसे परत करण्याची विनंती केली. त्याला उत्तर देताना एसपी संजीव पाटील म्हणाले की, तुमची समस्या लवकरात लवकर सोडवली जाईल.
सौंदत्ती तालुक्यात २०२१ व २०२२ मध्ये कंत्राटी तत्वावर पौरकार्मीकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र त्यांना पीएफ देत नसल्याची तक्रार केली. त्यावर उत्तर देताना एसपी संजीव पाटील यांनी संबंधितांना माहिती देऊन समस्या सोडविण्यात येईल, असे सांगितले.
बेळगाव तालुक्यातील नावगे येथे दसऱ्याच्या दिवशी आमच्या मुलीची हत्या झाली, याबाबत मारिहाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करूनही अद्याप तपास केला जात नाही अशी तक्रार एका व्यक्तीने फोन करून केली. याला उत्तर देताना डीसीपी शेखर एसटी यांनी मारिहाळ सीपीआय आणि पीएसआय यांना तपास करण्याच्या सूचना दिल्या जातील असे आश्वासन दिले.
देणगीच्या नावाखाली विनाकारण अवाजवी शैक्षणिक शुल्क घेणाऱ्या अथणी तालुक्यातील खासगी शैक्षणिक संस्थांवर कारवाई करावी, अशी तक्रार एका व्यक्तीने केली. त्यावर उत्तर देताना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पालकांनी आधी येऊन तक्रार केल्यास चौकशी करून संबंधित शैक्षणिक संस्थेवर मुलाहिजा न राखता कारवाई करू, असे सांगितले.
रायबाग तालुक्यातील मोरब गावातील एका व्यक्तीने यूट्यूब चॅनलच्या नावावर दावा करून लोकांना फोन करून त्रास दिला आहे. तसेच व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी तक्रार एकाने केली. याला उत्तर देताना एसपी संजीव पाटील म्हणाले की, संबंधितांचे नाव सांगून तक्रार दिल्यास यूट्यूब चॅनलचे नाव सांगून आणि ब्लॅकमेल करून जनतेला त्रास दिल्यास अशा व्यक्तीवर कारवाई केली जाईल.
बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांच्यावतीने राबविण्यात येणारा फोन-इन कार्यक्रम राज्यासाठी आदर्श आहे. या १३ व्या फोन-इन कार्यक्रमात तब्बल ७९० कॉल्स आले. उत्पादन शुल्क विभागाची समस्या जवळपास खूप ऐकली आहे. त्यावर पुढील कार्यक्रमात चर्चा केली जाईल. असे कार्यक्रम केल्यास जनतेच्या समस्या ऐकून घेण्यास मदत होईल, असे मत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी व्यक्त केले.
आजच्या फोन-इन कार्यक्रमात जनतेने शहरातील वाहतूक समस्या, जिल्ह्यातील अवैध धंदे, कौटुंबिक कलह, तालुक्यातील स्मशानभूमीची समस्या यासह विविध समस्या मांडल्या आणि लोकांनी जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संजीव पाटील आणि डीसीपी यांना फोन केला. शहर पोलीस विभागाकडे तक्रार करून समस्येवर तोडगा काढला.
या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, महादेव एस एम, बाळाप्पा तळवार, विठ्ठल मादार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल अधिकारी व शहर पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
0 Comments