- दिवसभरात ४८ वाहनावर कारवाई
- २२ हजार ३०० रुपयांचा दंड
निपाणी (प्रतिनिधी) : शहर आणि ग्रामीण भागात अनेक चार चाकी व दुचाकी वाहनधारक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत आहेत. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशानुसार रविवारपासून(ता.१८) नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी आणि चार चाकी वाहन धारकावर कारवाई केली जात आहे. पहिल्याच दिवशी निपाणी शहर आणि परिसरात एकूण ४८ वाहनधारकावर कारवाई करून २२हजार ३०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
अलीकडच्या काळात वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करत अनेक दुचाकी स्वार आपली वाहने हाकत आहेत. त्यामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. नियमांचे उल्लंघन करून ट्रिपल सीट जाणे, ट्रॅफिकचे नियम तोडणे, भर धाव वेगाने दुचाकी चालवणे यासह वाहतुकीचे नियम तोडण्याचे प्रकार सुरू आहेत. यावेळी अनेक दुचाकींचा अपघात होऊन काहीजणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशाप्रसंगी दुचाकीची संबंधित कागदपत्र असल्याने नुकसान भरपाई मिळणे ही कठीण झाले आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन जिल्हा पोलीस प्रमुख डॉ.संजीव पाटील यांच्या सूचनेनुसार शहरात विविध ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे.
त्यामध्ये ग्रामीण भागाचाही समावेश आहे. रविवारी सुट्टी असल्याने अनेक जण विविध कारणामुळेमुळे दुचाकी आणि चार चाकी वरून विविध ठिकाणी जात होते. तर अमावस्या असल्याने देवदर्शनासाठी ही दुचाकीवरून जाणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे दिवसभर चिक्कोडी रोड, बेळगाव नाका, मुरगुड रोड, कोल्हापूर वेससह विविध ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे कागदपत्रे नसलेल्या आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे यापुढे काळात रस्त्यावर वाहन नेतांना सर्वांनाच खबरदारी घ्यावी लागणार आहे.
---
'दुचाकी सह चार चाकी व वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, असा आदेश जिल्हा पोलीस प्रमुखांनी काढला आहे. त्यानुसार नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी स्वारावर रविवारपासून कारवाईची मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळण्यासह वाहनाचे सर्व कागदपत्रे स्वतःजवळ ठेवणे बंधनकारक आहे. अन्यथा वाहनधारकावर कारवाईचा बडगा उगारला जाईल.'
- संगमेश शिवयोगी, मंडल पोलीस निरीक्षक, निपाणी
0 Comments