- संभाजी गल्ली बेळगाव येथील सरकारी मराठी शाळा क्र. १२ मधील प्रकार
- मद्यपान केल्याने चक्क विद्यार्थ्यांसमोर झोपला
बेळगाव / प्रतिनिधी
ज्ञानदान करणाऱ्या विद्यामंदिरात चांगले संस्कार देऊन विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिक्षकी पेशाला कलंक लागण्यासारखी एक संतापजनक घटना आज बेळगाव शहरात उघडकीस आली आहे.
शहरातील धर्मवीर संभाजी महाराज उद्यानानजीक संभाजी गल्ली सरकारी मराठी शाळा क्र. १२ मध्ये मद्यधुंद अवस्थेतील एक शिक्षक विद्यार्थ्यांसमोर चक्क शाळेतच झोपल्याचा खळबळजनक प्रकार घडला. या शाळेतील कन्नड विषयाचा शिक्षक प्रमाणाबाहेर दारू पिऊन शाळेत आला. अतिमद्यप्राशन केल्याने त्याला धड चालता किंवा उभेही राहता येत नव्हते. काही वेळातच तो विद्यार्थ्यांसमोर झोपला. सकाळी मुलांना शाळेत सोडण्यासाठी आलेल्या पालकांना हा प्रकार समजताच त्यांनी संबंधित शिक्षकाला जाब विचारला. यावेळी त्या शिक्षकाला पालकांशी व्यवस्थित बोलताही येत नव्हते. अशा परिस्थितीतही तो दारू पिलो नाही असे सांगण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पालकांनी धारेवर धरताच तो विनवणी करू लागला.यावेळी पालकांनी विद्यार्थ्यांना बोलवून विचारले असता, एका लहान विद्यार्थिनीने शिक्षक दारू पिऊन आल्याने त्यांच्या तोंडालाही घाणेरडा वास येत असल्याचे सांगितले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पालकांनी आम्ही मुलांना शाळेत सोडण्यासाठी आलो असता, येथील कन्नड विषयाचा शिक्षक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळून आले. आम्ही याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता, त्यांनी तुम्हीच त्याचा व्हिडिओ काढून पोलिसांकडे तक्रार दाखल करा असे सांगितले. तर शिक्षणाधिकाऱ्यांकडून तक्रार आली तर कारवाई करु असे सांगून पोलिसांनीही जबाबदारी झटकली. त्यामुळे आम्ही तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. तंबाखू ,गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांची दुकाने सरकारी शाळा व कॉलेजच्या आवारापासून सुमारे १०० मीटर लांब अंतरावर असतात असे सरकारकडून सांगण्यात येते, मात्र अशा मद्यपी शिक्षकांची नेमणूक केल्याने मुलांचे भवितव्य धोक्यात असल्याचा मुद्दा उपस्थित करून सरकारने अशा शिक्षकांना जबाबदारीतून मुक्त करावे अशी मागणी केली.
पालकांनी धारेवर धरताच चूक झाली माफ करा असे सांगत संबंधित शिक्षक गयावया करत होता. अखेर पालकांनी तगादा लावताच शाळेच्या आवारातून अक्षरशः तो पळून गेला.
आता या सर्व प्रकारानंतर शिक्षण विभाग संबंधित शिक्षकावर कारवाई करणार की त्याच्या असभ्य , नियमबाह्य वर्तनाकडे दुर्लक्ष करून त्याला पाठीशी घालणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
0 Comments