- बदलीनिमित्त निरोप समांरभात पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांचे उदगार
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरात मागील दीड वर्षात काम करत असताना सर्वांचे सहकार्य लाभले. शहरात सर्व समाजाचे लोक एकजुटीने राहत असून , ते आपल्या समस्या अगदी बिनधास्त आमच्यासमोर मांडत होते .या काळात अनेक बंदोबस्त ठेवावे लागले. संपूर्ण पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो, जयंती मिरवणूका आणि अन्य कार्यक्रमावेळी शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यात यश मिळाले. इथे काम केल्याचे समाधान आहे असे उदगार पोलीस आयुक्त बोरलिंगय्या यांनी काढले.
गेली दीड वर्ष समर्थपणे बेळगावच्या पोलीस आयुक्तपदाची धुरा सांभाळणारे पोलिस आयुक्त एम.बी.बोरलिंगय्या यांची आयजीपी पदी पदोन्नतीने म्हैसूर येथे बदली करण्यात आली आहे. राज्य सरकाने नुकत्याच पदोन्नती देऊन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यामध्ये एम. बी. बोरलिंगय्या यांनाही बढती देण्यात आली आहे. यानिमित्त बेळगावच्या जिरगे सभागृहात त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. म्हैसूरला गेलो तरी इथे येऊन नक्की भेट देईन. बेळगाव हे शांतता प्रिय शहर आहे. त्याला गालबोट लागू देऊ नका, सर्वानी एकोप्याने राहा, सामाजिक सलोखा अबाधित ठेवा त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या निरोप समारंभात जिल्हाधिकारी नितेश पाटील , जिल्हा पंचायत सीईओ हर्षल भोयर, डीसीपी शेखर एच. पी. , लोकायुक्त एस. पी. महानंद नंदगावी, डीसीपी पी. व्ही. स्नेहा, केएसआरपी एस. पी. हंजा हुसेन यांनी तसेच शहरातील विविध समाज आणि संघटनांच्या प्रमुखांनी डॉ. बोरलिंगय्या यांच्या कार्याची प्रशंसा केली. यावेळी जिल्हा पोलीस आयुक्तालयाच्या वतीने, तसेच विविध संघटनांच्या वतीने डॉ. बोरलिंगय्या याचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले डॉ. नितेश पाटील म्हणाले, बदली हा सेवेचा एक भाग आहे. सरकारी नोकरीत सरकारचा आदेश अनिवार्यपणे, पाळावा लागतो. डॉ. बोरलिंगय्या यानी गेली दीड वर्षे , शहरात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखली आहे. शिवजयंती , गणपती विसर्जन , निवडणुका, राजकीय कार्यक्रम , मोदींच्या रोड शो दरम्यान त्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे.,आम्ही सर्वानी मिळून त्यांच्यासोबत शहराच्या आणि जिल्ह्याच्या हितासाठी काम केले आहे. बंगळूरमध्ये मी त्यांच्यासोबत काम केले आहे. बोरलिंगय्या हे अतिशय हुशार आणि शिस्तप्रिय अधिकारी आहेत, असे सांगून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सीएआरसी सिध्दनगौडा पाटील, एसीपी बरमनी, सदाशिव कट्टीमनी तसेच विविध समाजाचे प्रमुख उपस्थित होते.
0 Comments