• शहरात भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन  
  • जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने

बेळगाव / प्रतिनिधी 

निवडणुकीपूर्वी काँग्रेसने  विनाशर्त पाच गॅरंटी जाहीर केल्या होत्या. मात्र सत्तेवर येतात काँग्रेसने दिलेले वचन न पाळता या गॅरेंटीना अटी लागू केल्या आहेत. ही जनतेची फसवणूक असल्याचा आरोप करत बेळगाव शहरात आज भाजपच्यावतीने आंदोलन छेडण्यात आले.

तत्पूर्वी शहरातील चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून भाजप नेते व कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यानंतर अप्पर जिल्हाधिकारी शांतला यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी म्हणाले, सत्तेवर येताच काँग्रेसने जनतेची दिशाभूल  करण्यास सुरुवात केली असून निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने आता अटी घालून देत आहे. ही जनतेची फसवणूक आहे. दुधाचे दर १.५० रुपयांनी कमी करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे. घोष त्याबंदी कायदा मागे घेण्याबाबत पशुसंवर्धन मंत्र्यांच्या विधानावर बोलताना जर ते मानव संसाधन मंत्री असते तर त्यांनी काय केले असते कोण जाणे अशा शब्दात त्यांनी खिल्ली उडवली. काँग्रेसने दिलेल्या  गॅरंटींवर जनतेने विश्वास ठेवू नये अशी परिस्थिती निर्माण झाल्याने आम्ही आंदोलन करून इशारा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बेळगाव ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील म्हणाले, जनतेला खोटी आश्वासने देऊन सत्ता काबीज करायची आणि नंतर खरा रंग दाखवायचा आहे काँग्रेसचे जुने धोरण आहे. भाजपने कोणतीही फसवणूक न करता लोकांची मने जिंकण्याचे काम केले आहे. काँग्रेसला मी योग्य धडा शिकवू असा इशारा त्यांनी दिला. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर त्यांच्यामध्ये पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा देणारे कार्यकर्ते आहेत, यावरून त्यांची मानसिकता काय आहे हे दिसून येते. हे सर्व थांबवण्यासाठी जनता आणि भाजप नेहमीच विरोध करतील. भविष्यात असा प्रकार पुन्हा घडला तर त्याचे परिणाम वेगळे होतील असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील, डॉ. रवी पाटील, भाजप चिक्कोडी जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश नेर्ली, राज्य कार्यकारिणी सदस्य उज्वला बडवाण्णाचे, लीना टोपन्नावर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित  होते.