• आतापासूनच नेते मंडळीकडे फिल्डिंग
  • राजकीय हालचालींना वेग


निपाणी (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर अडीच वर्षासाठी अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आरक्षण आले होते. सध्या अडीच वर्षाचा कालावधी संपुष्टात आला असून त्यानंतर आता अडीच वर्षाच्या कालावधीसाठी कर्नाटक राज्य निवडणूक आयोगा कडून पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी दुसऱ्यांदा आरक्षण प्रक्रिया पार पडणार आहे. निपाणी तालुक्यातील ग्रामपंचाय अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी सोमवारी (ता.१२) चिक्कोडी जवळील हालट्टी येथील सिटी कॉन्व्हेंट हॉलमध्ये सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत निपाणी तालुक्यातील ग्रामपंचाय अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर होणार आहे.

ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाधिकाऱ्यांचा कालावधी संपुष्टात आल्याने सध्या ग्राम विकास अधिकारी कारभार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसला एक हाती सत्ता मिळाली आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाने उर्वरित अडीच वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर निपाणी तालुक्यातील राजकीय घडामोडी गतिमान झाल्या आहेत. गतवेळच्या आरक्षणानुसार अनेक ग्रामपंचायत मध्ये एकापेक्षा अनेक जण अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी पात्र होते. पण नेते मंडळींच्या सल्ल्यानुसार काहींनी माघार घेतली होती. आता मात्र आरक्षण येण्याआधीच अनेकांनी नेत्यांची मनधरणी सुरू केली आहे. त्यामुळे आता कोणत्या ग्रामपंचायत साठी कोणते आरक्षण येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. एकंदरीत अध्यक्ष, उपाध्यक्ष आल्यानंतर या निवडीसाठी नेते मंडळींना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

निपाणी तालुक्यात २७ ग्रामपंचायत असून त्यापैकी उत्तम पाटील यांच्या गटाकडे १८ ग्रामपंचायत आहेत. यापूर्वीच्या अध्यक्ष, उपाध्यक्क्षांच्या काळात राज्यात भाजपाचे सरकार कार्यरत होते. त्यामुळे भाजपची सत्ता नसलेल्या ग्रामपंचायत मध्ये विकास निधी न दिल्याचा आरोप झाला आहे. त्यामुळे आता राज्यात काँग्रेस सरकार असून काँग्रेसची सत्ता असलेल्या ग्रामपंचायतींना आता तरी विकास निधी मिळून ग्रामपंचायतींचा विकास होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.