• अन्यथा हेस्कॉम विरोधात तीव्र आंदोलन 
  • बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्ससह अन्य संघटनांचा इशारा 

बेळगाव / प्रतिनिधी 

राज्य सरकार 'गृहज्योती' या योजनेअंतर्गत सर्व घरांना दरमहा २०० युनिट मोफत वीज पुरवत असून ही एक हमी योजना आहे. मात्र त्यासाठी औद्योगिक क्षेत्राचे बिल वाढवणे योग्य नसल्याचे बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष हेमेंद्र पोरवाल, यांनी स्पष्ट केले. औद्योगिक क्षेत्रातील वीज बिलात वाढ करण्याच्या शासनाच्या निर्णयावर आज बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स च्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, बेळगावात लघुउद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना भरपूर वीज लागते. मात्र बेळगावचे लघुउद्योग मोठ्या प्रमाणात वीज बिल भरत आहेत. अशा परिस्थितीत वीज बिल वाढवले तर येथील उद्योग बंद होतील. अन्यथा असलेले उद्योग  नजीकच्या राज्यात स्थलांतरित करण्याची वेळ येईल असे त्यांनी सांगितले.  

मंगळवारी औद्योगिक वसाहतीतील  विज बिल दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात येणार असून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. सरकारने याकडे  दुर्लक्ष केल्यास राज्यभरात सर्वत्र आंदोलन छेडण्यात येईल असेही ते म्हणाले.

यावेळी औद्योगिक क्षेत्रातील वीजबिलात वाढ करण्याचा शासनाचा निर्णय सात दिवसांत मागे घ्यावा, अन्यथा हेस्कॉमच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स आणि संघटनांनी दिला आहे.

या पत्रकार परिषदेला रोहन जुवळी, डॉ. राजशेखर आनंद देसाई, राम भंडारी, महादेव चौगुले, दयानंद नेतलकर आदी उपस्थित होते.