बेळगाव / प्रतिनिधी
दरवर्षी १ जून रोजी सीमाभागातील मराठी भाषिकांकडून कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येते. त्यानुसार गुरुवारी सकाळी हिंडलगा हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील उपस्थित होते.
प्रारंभी आमदार पाटील यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर आणि खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी, युवा नेते आर.एम.चौगुले, रमाकांत कोंडुसकर, ॲड. अमर येळळूरकर, माजी जि. पं. सदस्य सरस्वती पाटील, मदन बामणे, खानापूरचे माजी आमदार दिगंबर पाटील, मुरलीधर पाटील, गोपाळ पाटील, माजी महापौर शिवाजी सुंठकर, आर.आय.पाटील, माजी ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, माजी ता. पं. सदस्य कृष्णा हुंदरे, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर आदींनी हुतात्मा स्मारकाला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थितांनी हुतात्मे अमर रहे , महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो, बेळगाव - कारवार - निपाणी - बिदर - भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा जोरदार घोषणा दिल्या.
यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील म्हणाले, नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत चांगले वातावरण होते. किमान दोन ते तीन जागांवर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार विजयी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र दुर्दैवाने या निवडणुकीत समितीला पुन्हा अपयश आले. राजकारणात यश - अपयश ठरलेलेच असते. तेव्हा या पराभवामुळे खचून न जाता पुन्हा एकदा आत्मविश्वास आणि नव्या जोमाने सीमालढ्याला बळकटी आणण्यासाठी लढत राहिले पाहिजे. महाराष्ट्र सरकारकडे यासाठी पाठपुरावा केला पाहिजे आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यानंतर युवा नेते आर. एम. चौगुले, ॲड.अमर येळळूरकर यांनी विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाला नगरसेवक शिवाजी मंडोळकर, ॲड. सुधीर चव्हाण, महादेव पाटील, नगरसेवक रवी साळुंखे, नगरसेविका सुधा भातखांडे, दत्ता पाटील, ॲड. महेश बिर्जे, धनंजय पाटील, अनंत पाटील, गणेश दड्डीकर, बी. डी. मोहनगेकर, माणिक होनगेकर यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, महिला आघाडी युवा आघाडी व युवा समितीचे पदाधिकारी, समिती कार्यकर्ते आणि मराठी भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments