- राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांची टिका
बेळगाव / प्रतिनिधी
जनतेच्या आशीर्वादाने कर्नाटकात सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारने केंद्र सरकारवर विरोधी निदर्शने करणे हे निषेधार्य आणि निंदनीय असल्याचे राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी सांगितले.
मंगळवारी बेळगाव शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले, काँग्रेस हे निव्वळ घोषणा करणारे सरकार आहे. कर्नाटकात सत्तेवर येताच निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने आणि केलेल्या घोषणांची पूर्तता करण्यास काँग्रेस सरकारला अपयश येत आहे.
निवडणुकीपूर्वी काँग्रेसने पूर्व नियोजन नसताना गॅरंटी योजना देण्याचे आश्वासन दिले. त्यामध्ये केंद्रीय आहार निगमच्यावतीने गरीब कुटुंबातील सदस्याला आणि एपीएल कार्डधारकांना प्रत्येकी ५ किलो तांदूळ देण्यात येत होते. सुमारे ८० कोटी जनतेने या योजनेचा लाभ घेतला. मात्र केंद्रीय आहार निगमच्या वतीने अन्नभाग्य योजनेसाठी तांदूळ दिला जात नाही असे खोटे सांगून कर्नाटक राज्यातील काँग्रेस सरकार जनतेची दिशाभूल करत आहे.
या विषयावर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन छेडणाऱ्या काँग्रेस राज्य सरकारच्या धोरणाचा त्यांनी तीव्र निषेध केला. याच दरम्यान पहिले २०० युनिट वीज मोफत देण्याचे सांगून त्याला आता अटी लावण्यात येत असल्याची टीका त्यांनी केली. केईआरसीच्या वतीने होत असलेल्या वीज बिलदरवाढीवर नियंत्रण मिळविण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे असा टोलाही त्यांनी लगावला.
या पत्रकार परिषदेत बेळगाव ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनीही काँग्रेसवर जोरदार टीका केली, आपल्या देशात लोक वेगवेगळ्या विषयात पीएचडी करतात. पण काँग्रेसने खोटे बोलून पीएचडी केली आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगभरात कौतुक होत आहे. मात्र आपले अपयश लपविण्यासाठी काँग्रेस पंतप्रधान मोदींच्या नावाचा वापर करत आहे हे निंदनीय असल्याचे ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेला बेळगाव भाजप शहर विभागाचे सरचिटणीस मुरूगेंद्रगौडा पाटील, दादागौडा बिरादर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments