खानापूर / वार्ताहर
दुचाकीची केएसआरटीसी परिवहनच्या बसला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकी वरील चौघेजण गंभीर जखमी झाले. खानापूर तालुक्यातील राज्य मार्गावर बिडी - गोल्याळीनजीक अपघात प्रवण वळणावर ही घटना घडली.
या अपघातात भिमाप्पा व्हन्नूर, यल्लाप्पा व्हन्नूर, पल्लवी व्हन्नूर, ऐश्वर्या व्हन्नूर चौघेही (रा.कर्तन बागेवाडी) हे जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
या अपघातातील जखमी झालेले सर्वजण एकाच दुचाकीवरून प्रवास करत होते. बिडी - गोल्याळीनजीक एका धोकादायक वळणावर दुचाकीचा हँडल न वळल्याने समोरून येणाऱ्या हल्याळहून खानापूरकडे जाणाऱ्या केएसआरटीसी बसला दुचाकीची धडक बसली. ही धडक इतकी जोराची होती की, यात दुचाकी वरील तिघांचे पाय निकामी झाले आहेत. तर दोघांची प्रकृती चिंताजनक असून अधिक उपचारासाठी त्यांना बेळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद नंदगड पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments