•  अपघातात जखमी झालेल्या दांपत्याला स्वतःच्या वाहनातून केले रुग्णालयात दाखल

निपाणी (प्रतिनिधी) : पोलीस प्रशासनाबद्दल नागरिकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा झाला आहे. पण पोलिसाकडेही माणुसकी असल्याचे चित्र शुक्रवारी (ता.९) रात्री साडेसात वाजता सुमारास दिसून आले. पट्टणकुडी येथील रस्त्यावर दुचाकीवर जाणाऱ्या दाम्पत्यांचा अपघात होऊन ते रस्त्यावर पडले होते. पण मदतीसाठी कोणीच न आल्याने हे दाम्पत्य रस्त्यावरच पडून होते. याचवेळी निपाणी होऊन चिक्कोडीकडे जाणारे चिक्कोडीचे पोलीस उपाधीक्षक बसवराज यलीगार यांनी तात्काळ जखमी अवस्थेतील दांपत्याला आपल्या वाहनातून घेऊन निपाणी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांनी दाखवलेल्या या माणुसकीमुळे त्यांचे निपाणी व चिक्कोडी परिसरात कौतुक होत आहे.

याबाबत घटनास्थळासह रुग्णालयातून समजलेली अधिक माहिती अशी, निपाणी येथे हिंदुत्ववादी संघटनेचा मूक मोर्चा पाठवून रात्री साडेसात वाजता सुमारास बसवराज यलीगार हे आपल्या चार चाकी वाहनातून चिक्कोडीकडे निघाले होते. यावेळी पट्टणकुडी येथून दुचाकीने निपाणी कडे येणारे सादिक सय्यद(वय ५४) आणि त्यांची पत्नी निपाणी कडे येत होते. निपाणी येथे एका नातेवाईकाकडे दुचाकी लावून ते चिकोडी येथील दुसऱ्या नातेवाईकाकडे कार्यक्रमाच्या निमित्ताने चार चाकी वाहनातून जाणार होते. तत्पूर्वीच पट्टणकुडी गावाबाहेर येताच त्यांची पत्नी परवीन(वय ४७) यांचा अंगावरील बुरखा दुचाकीच्या मागी चाकात अडकला. त्यामुळे सादिक यांचा दुचाकी वरील ताबा सुटून रस्त्यावर दुचाकी पडली.

यावेळी सादिक यांच्या हाताला दुखापत झाल्या असून परवीन त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मात्र अपघातानंतर मदतीसाठी कुणीच न आल्याने तिथून जाणारे पोलीस उपाधीक्षक बसवराज यलीगार यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ सय्यद दांपत्याला आपल्या वाहनातून आणून निपाणीतील डॉ. निर्मळे यांच्या रुग्णालयात दाखल केले. सुमारे वीस मिनिटे डॉक्टरांची चर्चा करून त्यांना योग्य उपचार करण्याची विनंती करून यलीगारर हे पुन्हा चिक्कोडीकडे रवाना झाले. त्यांनी केलेल्या या कार्यामुळे खाकी वर्दीमध्येही माणुसकी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या अपघातात परवीन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून रात्री डोक्याचे सिटी स्कॅन करून अधिक उपचार डॉ. राहुल निर्मळे हे करीत आहेत. अपघातानंतर तात्काळ गंभीर जखमी परविन यांना रुग्णाला दाखल केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. रात्री उशिरा खडकलाट पोलीस घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करीत होते.