बेळगाव / प्रतिनिधी 

येळ्ळूर गायरान जमिनीमध्ये होणारे आंतरराष्ट्रीय स्टेडियम अन्यत्र उभारण्यात यावे. तसेच जलजीवन मिशन योजना आणि वीज पुरवठ्याची समस्या सोडवण्याबरोबरच अन्य विकास कामांना बाधा ठरणाऱ्या समस्या आपण जातीने लक्ष देऊन सोडवाव्यात, अशी मागणी येळ्ळूर ग्रामपंचायत आणि समस्त गावकऱ्यांच्यावतीने जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे करण्यात आली आहे.

बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी आज गुरुवारी सकाळी येळ्ळूर ग्रा. पं. अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील, म. ए. समितीचे नेते व श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर आदींच्या नेतृत्वाखाली येळ्ळूरवासियांनी मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन त्यांना उपरोक्त मागणीचे निवेदन सादर केले. येळ्ळूर सर्व्हे नं. 1142 मधील 49 एकर 13 गुंठे जागा गायरान म्हणून नोंद आहे. येळ्ळूरची लोकसंख्या 25,000 आहे. यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी वर्ग असून गावाला लाभलेल्या या 49 एकर 13 गुंठे गायरानाच्या जागेपैकी जर 40 एकर जागा आंतरराष्ट्रीय क्रीडांगणासाठी  गेली तर याचा फटका संपूर्ण शेतकरीवर्गाला बसणार आहे. त्यांच्या गाई, म्हशी वगैरे पशुधनाला चारा मिळणे दुरापास्त होणार आहे. या खेरीज भविष्याच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास ग्रामपंचायतीच्या नवीन उपाययोजना आणि स्कीम्सची पूर्तता करण्यासाठी गावाकडे जागाच शिल्लक राहणार नाही. 


यात भर म्हणून येळ्ळूरमधून रिंग रोड करण्याचा घाट सरकारने घातला आहे. रिंग रोड अर्थात विकासाच्या नावाखाली गावातील पिकाऊ जमीन व गायरान नष्ट केले जाणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत कांही घरे, गावातली हरी मंदीर प्राथमिक आरोग्य केंद्र, गावाला पाणीपुरवठा होणाऱ्या मुख्य टाक्या यांच्यावर ही गदा येणार असून गावाला या सर्व गोष्टीही गमवाव्या लागणार आहेत. या सर्व गोष्टींना सारासार विचार करून ग्रामपंचायतीने  सर्वानुमते ठराव करून त्यापूर्वी अनेकदा विरोध देखील केला आहे. मात्र दुर्दैवाने त्याची दखल घेण्यात आली नाही. 


येळ्ळूर गावासाठी सरकार मार्फत राबविण्यात आलेली जलजीवन मिशन योजनेचे काम गेली 2 वर्ष सुरूच आहे. सदर सुमारे 5 कोटी रुपये खर्चाची योजना सबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि मनमानीमुळे अयशस्वी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या महोदयांकडून चुकीच्या पद्धतीने पाईपलाईन घालणे, नळाची जोडणी करताना कोणतेच नियोजन नसणे, फिल्टर प्लांटमध्ये पाण्याचा शुद्धीकरण योग्य प्रकारे न होणे, पाण्याच्या टाकीचे वॉटर प्रूफिंग योग्य प्रकारे नसणे असे प्रकार करण्यात आले आहेत. गावामध्ये एकूण 7 विभाग आहेत. एखाद्या विभागात जर 200 नळ कनेक्शन असतील तर त्यातील फक्त 50 टक्के नळांना पाणी येणे, तेही कमी दाबाने असणे. कांही ठिकाणी पाईपला गळती असणे, अद्याप बऱ्याच ठिकाणी पाईप लाईन जोडणीचे काम अपूर्ण असणे. 

पाणीपुरवठा प्रमाणे वीज पुरवठ्याबाबतही निवेदनाद्वारे मंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली. गावातील जीर्ण झालेल्या पथदिपांच्या ठिकाणी नवे पथदीप बसविणे. टीसी खराब झाले आहेत तर त्याची दखल घेऊन त्यांची दुरुस्ती करणे अथवा ते बदलणे, काही ठिकाणी घरावरून धोकादायकरित्या गेलेल्या विद्युत तारा हटवणे. या संदर्भात ग्रामपंचायत मार्फत सबंधित अधिकाऱ्याना वारंवार निवेदन देऊन देखील दुर्लक्ष करण्यात आले आहे. तसेच गावांतील रस्ते, गटारी आणि इतर विकास कामांकडेही लक्ष देऊन ती कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत आणि आम्हा येळ्ळूरवासीयांना सहकार्य करावे, आशयाचा तपशील जिल्हा पालकमंत्र्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे. 

पालक मंत्री आणि सार्वजानिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी निवेदनाचा स्वीकार करून आपण स्वतः यामध्ये जातीने लक्ष घालून यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले. याप्रसंगी ग्रा. पं. अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील, श्रीराम सेना हिंदुस्तान अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, ग्रा. पं. सदस्य प्रमोद पाटील, शिवाजी नांदुरकर, रमेश मेणसे, परशराम परीट, राकेश परीट, दयानंद उघाडे, ज्योतिबा चौगुले, माजी ग्रा. पं. अध्यक्ष अनुसया परीट, रूपा पुण्ण्यानावर, मनीषा घाडी, राजू डोण्ण्यान्नवर, सोनाली येळ्ळूरकर , लक्ष्मण छत्र्याण्णावर आणि गावातली नागरीक उपस्थित होते.