• सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री तर डी. के. शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
  • अद्याप अधिकृत घोषणा होणे बाकी

बेंगळूर / वार्ताहर 

कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण? यावर गेल्या चार दिवसांपासून चर्चा सुरु होती, या चर्चेवर आता पडदा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतल्याची माहिती काँग्रेस पक्षाच्या अधिकृत सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार चार दिवसांपासून मुख्यमंत्री पदाबाबत दिल्लीमध्ये अनेक बैठका झाल्या. मुख्यमंत्रीपदासाठी डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या हे शर्यतीत होते. याबाबतचा निर्णय घेण्याची जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी मल्लिकार्जून खर्गे यांच्यावर सोपवली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली.
या बैठकीत काँग्रेस अध्यक्षांनी निरीक्षकांना सर्व आमदारांशी चर्चा करण्यास सांगितले होते. यात 80 हून अधिक आमदारांनी सिद्धरामय्या यांच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे डी. के. शिवकुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्री यांच्यासह ऊर्जा आणि पाटबंधारे ही दोन खाते आणि प्रदेशाध्यक्षही पद असेल. अशी माहिती मिळाली आहे. तसेच उद्या गुरुवारी (18 मे) शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती समोर आली असून, अद्याप अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.