- मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची आमदारांना सूचना
- बेंगळूर विधानसौध येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक
बेंगळूर दि. २४ मे २०२३
आगामी लोकसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून आतापासूनच जनतेसाठी प्रामाणिकपणे कामाला सुरुवात करा असा संदेश काँग्रेसच्या आमदारांना देण्यात आला. आज बेंगळूरच्या विधानसौध येथे झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री तथा केपीसीसी अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी या सक्त सूचना आमदारांना दिल्या. या बैठकीत सत्तावाटप आणि मंत्रिपदांसह पक्षाच्या अंतर्गत प्रश्नांवर गंभीर चर्चा झाली. मात्र प्रसार माध्यमांसमोर अशा विषयांबद्दल उघडपणे वक्तव्य करू नये, याचा विपरीत परिणाम सरकार आणि पक्षावर होण्याची शक्यता आमदारांना पटली आहे.
यावेळी लोकसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीचे काम तातडीने सुरू झाले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीचा विषय सहजतेने घेऊ नका, ही हायकमांडने दिलेली सूचना असल्याचे त्यांनी आमदारांना समजावून सांगितले.
दरम्यान उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी लोकसभा निवडणुकीत आम्हाला २० जागा जिंकायच्या आहेत. विधानसभा निवडणुकीत आम्ही जिंकलो, एवढ्यावरच समाधान न मानता, लोकसभा निवडणुकीतही ही विजयी घौडदौड कायम राहिली पाहिजे. बीबीएमपी निवडणुकीतही जिंकायचे आहे. खातेवाटपानंतर मंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात पक्ष आणि आमदार कार्यालयांची स्थापना झाली पाहिजे असे ते म्हणाले. पक्ष कार्यालय हे आमच्यासाठी मंदिराप्रमाणे आहे. त्याला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. प्रत्येकाला सत्ता मिळू शकत नाही. पण, तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल. पक्षाचे काम हे देवाचे काम म्हणून करायला हवे असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच निवडणुकीत तुमच्या विजयासाठी कष्ट घेतलेल्या कार्यकर्त्यांना विसरू नका राज्यातील जनतेला स्वच्छ आणि पारदर्शी प्रशासन देण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. तेव्हा सावधगिरीने काम करावे असा सल्लाही त्यांनी आमदारांना दिला. या बैठकीला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे सदस्य आणि नवनिर्वाचित आमदार उपस्थित होते.
0 Comments