- १८ पैकी ११ मतदारसंघात काँग्रेस तर ७ मतदारसंघात भाजपचा विजय
- बेळगाव दक्षिणसह खानापूर मतदार संघात फुलले भाजपचे कमळ
- काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर यांनी राखला बेळगाव ग्रामीणचा गड
- खानापुरात भाजपचे उमेदवार विठ्ठल हलगेकर यांचा दणदणीत विजय
- यमकनमर्डी आणि गोकाकमध्ये जारकीहोळी बंधूंचा वरचष्मा
- निपाणीत शशिकला जोल्ले यांची विजयाची हॅट्रिक
- कागवाड मधून भरमगौडा उर्फ (राजू) कागे विजयी
बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा आज निकाल लागला. या निकालानंतर राज्यात सत्तांतर झाले आहे. विकासाच्या मुद्द्यावर निवडणुक लढविलेल्या भाजपच्या डबल इंजिन सरकारला नाकारत जनतेने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे . राज्यात काँग्रेसने सत्ता स्थापनेसाठी लागणारा बहुमताचा आकडा पार केला असून काँग्रेसला स्पष्ट बहुमताचे सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली आहे. तर बेळगाव जिल्ह्यातील १८ पैकी ११ मतदारसंघात काँग्रेसचे तर ७ मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत .
- बेळगाव जिल्ह्यातील मुख्य लढतींचे निकाल खालीलप्रमाणे -
- बेळगाव दक्षिणमध्ये म. ए. समितीचे रमाकांत कोंडुसकर यांची कडवी झुंज -
- अटीतटीच्या लढतीत भाजपचे अभय पाटील विजयी -
बेळगाव तालुक्याच्या शहरी भागातील सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या दक्षिण मतदार संघात भाजपचे उमेदवार अभय पाटील यांनी म. ए. समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांचा ११,७६२ मतांच्या फरकाने पराभव केला. अभय पाटील यांना ७६,२४९ तर रमाकांत कोंडुसकर यांना ६४,४८७ मते मिळाली. या विजयासह अभय पाटील तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत.
- बेळगाव उत्तर मतदार संघातून काँग्रेसचे असिफ सेठ विजयी -
अगदी शेवटच्या फेरीपर्यंत अटीतटीच्या ठरलेल्या लढतीत बेळगाव उत्तर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार असिफ उर्फ राजू सेठ त्यांनी भाजपचे उमेदवार रवी पाटील यांचा ४५४१ मतांच्या फरकाने पराभव केला. असिफ उर्फ राजू सेठ यांना ६८,८६३ तर रवी पाटील यांना ६४३१२ मते मिळाली.
- खानापूर मतदारसंघात विठ्ठल हलगेकर यांचा दणदणीत विजय -
खानापूर मतदार संघात भाजपचे उमेदवार विठ्ठल हलगेकर यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेसच्या अंजली निंबाळकर यांचा ५४,२०२ मतांच्या फरकाने पराभव केला. विठ्ठल हलगेकर यांना ९१,२३७ तर काँग्रेसच्या अंजली निंबाळकर यांना ३७,२०२ मते मिळाली. गतवेळी म. ए. समितीतील मतभेदांमुळे जनतेने अंजली निंबाळकर यांना पाठींबा देत आमदार म्हणून निवडून दिले होते.
- काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर यांनी राखला बेळगाव ग्रामीणचा गड -
बेळगाव तालुक्याच्या ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी १,०६,८०५ मतांसह विजय संपादन केला. येथे भाजपचे उमेदवार नागेश मनोळकर यांना ५१, २५९ तर म. ए. समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले यांना ४१,३६२ मते मिळाली आहेत. या विजयासह लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगाव ग्रामीणचा गड काँग्रेसकडे राखण्यात यश मिळवले असून त्या दुसऱ्यांदा आमदार झाल्या आहेत.
- यमकनमर्डी आणि गोकाकमध्ये जारकीहोळी बंधूंचा वरचष्मा -
यमकनमर्डीत काँग्रेसकडून सतीश जारकीहोळी तर गोकाकमधून रमेश जारकीहोळी यांनी पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले. यमकनमर्डीत सतीश जारकीहोळी यांनी ९९,९८७ मतांसह विजय मिळविला. येथे भाजपचे उमेदवार बसवराज हुंदरी यांना ४२,९४१ तर म. ए. समितीचे उमेदवार मारुती नाईक यांना २०४९ मते मिळाली.
गोकाक मतदार संघातून भाजपचे उमेदवार रमेश जारकीहोळी विजयी झाले. रमेश जारकीहोळी यांना १,०४,०६८ तर काँग्रेसचे उमेदवार महांतेश कडाडी यांना ७९४३१ मते मिळाली आहेत. रमेश जारकीहोळी यांनी २४,६३७ मतांच्या फरकाने मोठा विजय मिळविला आहे.
- निपाणीत शशिकला जोल्ले यांच्या विजयाची हॅट्रिक -
तिरंगी लढतीचा फायदा कोणाला होणार याबाबत निपाणी विधानसभा मतदारसंघासह सीमाभागात उत्कंठता असणाऱ्या निपाणी मतदार संघात भाजपच्या उमेदवार शशिकला जोल्ले यांनी विजयाची हॅटट्रिक साधली. त्या ९८७६ मतांनी विजयी झाल्या. राष्ट्रवादीची साथ मिळालेल्या नवख्या उत्तम पाटील यांनी कडवी झुंज दिली. गेल्या दहा वर्षांत भाजपच्या सत्तेच्या जोरावर जोल्ले यांनी मतदार संघाचा केलेला विकास, तसेच विविध योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून वाढविलेला लोकसंपर्क त्यांच्या पत्त्यावर पडला.तर काकासाहेब पाटील यांना सलग सहाव्यांदा उमेदवारी देवून काँग्रेसने ठेवलेला विश्वास फोल ठरला. या मतदारसंघात काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
- अथणीच्या हाय व्होल्टेज लढतीत लक्ष्मण सवदी अजिंक्य -
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या हाय व्होल्टेज अथणी मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार लक्ष्मण सवदी यांनी १,३०,४७८ मतांसह दणदणीत विजय प्राप्त केला. येथे भाजपचे उमेदवार महेश कुमठळ्ळी यांना ५४, ८०५ मतांवर समाधान मानावे लागले. भाजपने उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या लक्ष्मण सवदी यांनी भाजप हायकमांडला झुगारून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या निर्णयाने भाजपला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे भाजपनेही या मतदार संघातील लढत प्रतिष्ठेची मानून तिथे चांगलाच जोर लावला होता. त्यामुळे या मतदार संघातील लढत हायव्होल्टेज ठरली होती. त्यात सवदी यांनी बाजी मारून पुन्हा एकदा अथणीचा आपला बालेकिल्ला अभेद्य राखला आहे.
- कागवाड मधून काँग्रेसचे भरमगौडा कागे विजयी -
कागवाडमधून काँग्रेसचे भरमगौडा उर्फ (राजू) कागे यांनी भाजपच्या श्रीमंत पाटील यांचा ८८९० मतांच्या फरकाने पराभव करून विजय संपादन केला. काँग्रेसचे भरमगौडा उर्फ (राजू) कागे यांना ८२,८३८ तर श्रीमंत पाटील यांना ७३, ९४८ मते मिळाली. जनतेच्या कायम संपर्कात राहिलो आणि जनतेच्या आशीर्वादाने विजयी झाल्याचे कागवाड काँग्रेसचे विजयी उमेदवार भरमगौडा उर्फ (राजू) कागे यांनी सांगितले.कागवाड विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार राजू कागे यांनी विजयी झाल्यावर शहरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, माझा हा पाचवा विजय असून जनतेच्या सततच्या सहवासामुळे जनतेने मला आशीर्वाद दिले आहेत.मतदारसंघाचा विकास हेच आमचे ध्येय आहे. महाराष्ट्र सीमेवरील आमचा मतदारसंघ अतिशय मागासलेला असून, सिंचनापासून वंचित गावे आहेत. मतदारसंघाच्या विकासावर अधिक भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
- बेळगाव जिल्ह्यातील इतर मतदार संघांचे निकाल खालीलप्रमाणे :
- बैलहोंगलमध्ये काँग्रेसचे उमेदवार महांतेश कौजलगी ५७७८३ मतांनी विजयी
- कित्तूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार बाबासाहेब पाटील ३,३९० मतांनी विजयी
- सौंदत्तीमध्ये काँग्रेसचे उमेदवार विश्वास वैद्य १४,७१६ मतांनी विजयी
- रामदुर्गमध्ये काँग्रेसचे उमेदवार अशोक पट्टण ११,५५३ मतांनी विजयी
- अरभावी मतदारसंघात भाजपचे भालचंद्र जारकीहोळी यांचा ९०,४२२ मतांनी विजयी
- चिक्कोडी विधानसभा मतदारसंघातील निकाल खालीलप्रमाणे :
- कुडचीमध्ये काँग्रेसचे उमेदवार महेंद्र तम्मण्णावर ८५,३२१ मतांनी विजयी
- चिक्कोडी मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार गणेश हुक्केरी ७७,७४९ मतांनी विजयी
- हुक्केरी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार निखिल कत्ती ४२,३२० मतांनी विजयी
- रायबाग मतदारसंघात दूर्योधन ऐहोळे ३४,६१४ मतांनी विजयी
0 Comments