• महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मतदारांना आवाहन
  • मार्केटयार्ड ते कंग्राळी (बीके) पदयात्रे दरम्यान मतदारांशी साधला संवाद 
  • नागेश मनोळकर यांच्या प्रचारार्थ झाली पदयात्रा  
  • कार्यकर्ते आणि चाहत्यांचा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद  

सुळगा (हिं.) / वार्ताहर 

जनतेची दिशाभूल करून विकास कामांच्या भूलथापा आणि अमिषांचे गाजर दाखवत मते मागणाऱ्या विरोधकांना दूर सारून भाजपला विजयी करा असे आवाहन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

बेळगाव तालुक्यातील एपीएमसी मार्केटयार्ड ते कंग्राळी (बीके) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मतदार संघातील भाजपचे अधिकृत उमेदवार नागेश मनोळकर यांच्या प्रचारार्थ पदयात्रा झाली. या पदयात्रेत जनतेला उद्देशून बोलताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्रात नरेंद्र मोदी आणि कर्नाटकात बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या डबल इंजिन सरकारने मूलभूत सुविधांचा विकास करण्यासह अनेक लोककल्याणकारी प्रकल्प राबविले आहेत. 

विकासाचे हे पर्व सुरू ठेवण्यासाठी तसेच ग्रामीण मतदारसंघाचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी येत्या १० मे रोजी बॅलेट युनिट वरील पहिल्या क्रमांकावर असलेल्या कमळाच्या चिन्हा समोरचे बटण दाबून मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार नागेश मनोळकर यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.



प्रारंभी दुपारी दोन वाजता त्यांचे एपीएमसी ज्योतीनगर कॉर्नर येथे आगमन झाले. यानंतर ठीक तीन वाजता येथून पदयात्रेला सुरुवात झाली.देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतील या पदयात्रेला भाजपचे कार्यकर्ते आणि चाहत्यांची  गर्दी झाली होती. 

डोक्यावर भगव्या टोप्या, गळ्यात भाजपची शाल आणि हातात भाजपचे ध्वज घेऊन कार्यकर्ते आणि समर्थक या पदयात्रेत सहभागी झाले होते. विशेषतः युवक आणि पुरुषांच्या बरोबरीने महिलांची  संख्याही लक्षणीय होती. 

रॅली दरम्यान कार्यकर्त्यांनी नागेश मनोळकर आणि भारतीय जनता पक्षाचा जयजयकार करणाऱ्या जोरदार घोषणा दिल्या.

कंग्राळी (बीके) येथे छत्रपती शिवाजी महाराष्ट्र चौकातील शिवमूर्तीला अभिवादन करून या पदयात्रेची सांगता झाली.



या पदयात्रेला बेळगाव ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार संजय पाटील, बेळगावच्या उपमहापौर रेश्मा पाटील, बेळगाव ग्रामीण भाजप मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, ग्रामीण विभाग प्रभारी तथा ओबीसी मोर्चा सचिव कर्नाटक राज्य किरण जाधव, महाराष्ट्रातील भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, हिंडलगा ग्रा. पं. चे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य रामचंद्र मनोळकर,काशिनाथ नाईक शिल्पा गौडर यांच्यासह मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.