- जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरण बैठकीत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची सूचना
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी किंवा पूर आल्यास जीवित हानी टाळण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना राबवाव्यात,अशी सक्त सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी आयोजित जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाची बैठक झाली. याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, प्रत्येक तालुक्यात आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेऊन पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी योग्य ती तयारी करावी असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
बेंगळूर येथे घडलेल्या दुर्घटनेसारखी घटना बेळगाव जिल्ह्यात घडणार नाही यासाठी दक्षता घेण्यात यावी, शेतात विद्युतभारित तारा पडल्याने काही ठिकाणी जीवितहानी झाल्याची माहिती आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये असेही त्यांनी सांगितले.
शहर - उपनगरी भागातील गटारी, नाले स्वच्छ करून गाळ काढण्याचे काम प्राधान्याने करावे, गटारी आणि नाले स्वच्छ केले तर पाणी सुरळीतपणे वाहते असे ते म्हणाले.
नदीवर पोहायला गेल्यानंतर बऱ्याचदा दुर्घटना घडतात. त्यामुळे या ठिकाणी खबरदारीच्या सूचनांचे फलक लावावे, याशिवाय नदीकाठच्या धोकादायक ठिकाणांबाबतही फलक लावण्यात यावे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने जीवितहानी होते, अशावेळी रस्त्यालगतच्या धोकादायक झाडांचे निरीक्षण करण्यात यावे. गरज भासल्यास नियमानुसार वनविभागासह धोकादायक झाडे हटविण्यात यावीत. पिण्याच्या पाण्याची टंचाई भासल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची सोय करावी. तसेच जनतेला आपत्कालीन मदत मिळण्यासाठी सर्व तालुका केंद्रात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात यावा. कृष्णा, मलप्रभा, घटप्रभा यासह सर्व नद्यांच्या प्रवाहावर सतत लक्ष ठेवण्यात यावे. आपत्कालीन सेवेसाठी लागणारी बोट जेसीबी व इतर उपकरणे याबाबत सर्व प्रकारची तयारी करावी अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
पूर परिस्थितीत सुरक्षितस्थळी स्थलांतरित केलेल्या लोकांच्या योग्य निवास आणि भोजनाची सोय करण्यासाठी केअर सेंटरची स्थापना करावी. याशिवाय प्रत्येक गावात गाव स्तरावर लोकांना पावसाच्या अंदाज ची माहिती देण्यात यावी. वादळी वाऱ्यामुळे उन्मळून पडलेली झाडे तात्काळ हटविण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री व उपकरणे तयार ठेवावी असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीला जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, उपविभाग अधिकारी बलराम चव्हाण, बैलहोंगलच्या विभागाधिकारी प्रभावती यांच्यासह विविध खात्याचे जिल्हास्तरीय अधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व तहसीलदार आणि पीडीओ उपस्थित होते.
0 Comments