• सकाळच्या सत्रातील मतदानाची संथगती दुपारपर्यंत कायम 
  • राजकीय पक्षांचे उमेदवार आणि लोकप्रतिनिधींनी बजावला मतदानाचा हक्क


बेळगाव / प्रतिनिधी 

कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी आज राज्यभरात मतदान सुरु आहे. दरम्यान बेळगाव जिल्ह्यात १८ विधानसभा मतदारसंघात सर्वत्र आज सकाळी ७ वाजता मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. यामध्ये बेळगाव शहरात बेळगाव उत्तर, दक्षिण आणि ग्रामीण मतदारसंघातील चुरशीच्या लढती होत आहेत. मात्र सकाळच्या सत्रात मतदानाला संथ प्रतिसाद मिळल्याचे दिसून आले. मतदानाने म्हणावी तशी गती घेतली नसल्याने दुपारी  ३ वाजेपर्यंत जिल्ह्यात ५३.७९ टक्के इतकेच मतदान झाले आहे. 

यामध्ये अथणी मतदार संघात सर्वाधिक ५९. ३५ टक्के तर बेळगाव उत्तर मतदार संघात सर्वात कमी ४३.५४ टक्के मतदान झाले आहे. दुपारी ३ वाजेपर्यंतही मतदान संथगतीने सुरु असल्याने अपेक्षित टक्केवारीत घाट झाल्याचे चित्र आहे. 

मतदान केंद्रांच्या परिसरात, दोनशे मीटर लांब अंतरांवर राजकीय पक्षांनी मतदारांना मतदान केंद्र, मतदान यादीतील क्रमांक आदी तपशील देणाऱ्या चिठ्ठ्या देण्यासाठी बूथ लावले आहेत. या टेबलांवर मतदारांची नावे विचारून तपशिलाच्या चिठ्ठ्या देण्यात येत होत्या. याठिकाणी राजकीय पक्षांचे ध्वज, चिन्हे, फलक लावण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.मतदान कक्षाबाहेर रायफलधारी निमलष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय पोलिसांची फिरती पथके गस्त घालत आहेत.

- राजकीय पक्षांचे उमेदवार आणि लोकप्रतिनिधींनी बजावला मतदानाचा हक्क -

यावेळी जेष्ठ आणि वयोवृद्ध व्यक्तींच्या बरोबरीने राजकीय पक्षांचे उमेदवार आणि लोकप्रतिनिधींनी आपापल्या विभागातील मतदान केंद्रांवर कुटुंबियांसमवेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला.