- बसमधील १० जण किरकोळ जखमी
- बेळगाव - वेंगुर्ला मार्गावर कुद्रेमनी फाट्यानजीक घटना
सुळगा (हिं.) / वार्ताहर
खाजगी कंपनीची बस व कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कारचालक जागीच ठार झाला. तर बस मधील १० जण किरकोळ जखमी झाले. बेळगाव - वेंगुर्ला मार्गावरील कुद्रेमनी फाट्यानजीक हा अपघात झाला. अपघातातील जखमींवर बेळगाव येथील रुग्णालयात अधिक उपचार सुरू आहेत. बाळाराम यादबा अर्जुनवाडकर (वय ६०, रा. माणगाव, ता. चंदगड) असे मृत कारचालकाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, दुपारी साडेतीन वा. सुमारास मृत अर्जुन वाडकर स्वतःच्या कारने बेळगाव मधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या नातेवाईकाला घरी आणण्यासाठी निघाले होते. दरम्यान कुद्रेमनी फाट्यानजीक आले असता, कामगारांना घेऊन जाणारी खाजगी कंपनीची बस आणि अर्जुनवाडकर यांच्या कारची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोराची होती की, कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. कारच्या इंजिनचा भाग चेपल्यामुळे तो चालकाच्या दिशेने दाबला गेला. यात अर्जुन वाडकर यांचा मृतदेह अडकला होता. स्टेअरिंग आदळल्याने मृत अर्जुनवाडकर यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता.
या जोरदार धडकेमुळे बसही नजीकच्या झाडावर जाऊन आदळली. यात दहा कामगार किरकोळ जखमी झाले. मात्र बस चालकाने सीट बेल्ट लावल्यामुळे तो सुदैवाने अपघातातून बचावला.
0 Comments