- अनोख्या स्वागताने विद्यार्थ्यांसह पालकही भारावले
![]() |
(फोटो सौजन्य : यल्लाप्पा हरजी) |
सांबरा / मोहन हरजी
उन्हाळी सुट्टी संपल्याने बुधवार ३१ मे रोजी शाळा पुन्हा सुरू झाल्या आणि तब्बल दीड महिन्याच्या कालावधीनंतर शांत झालेला शाळांचा परिसर पुन्हा एकदा मुलांमुळे गजबजला. खाजगी शाळांना मंगळवारपासून सुरुवात झाली होती. मात्र बुधवार पासून सरकारी शाळा सुरू झाल्या. सुट्टीनंतर बऱ्याच कालावधीने आपले शिक्षक - शिक्षिका, मित्र-मैत्रिणी, शाळेचा परिसर, वर्ग भरल्याची घंटा, मधली सुट्टी अनुभवता येणार असल्याने विद्यार्थ्यांमध्येही उत्साह दिसून आला.
प्रारंभी शहरासह तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. काही शाळांनी बैलगाडीतून मिरवणूक तर काही शाळांनी फुलांची उधळण करत शाळेत प्रवेश घेतलेल्या नूतन विद्यार्थी विद्यार्थिनींसह पुढच्या इयत्तेत जाणाऱ्या विद्यार्थी - विद्यार्थिनींचे स्वागत केले. स्वागतासाठी शाळांच्या प्रवेशद्वारावर रांगोळ्याही रेखाटल्याचे पाहायला मिळाले.
सांबरा (ता. बेळगाव) येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा सांबरा येथेही शाळेचा प्रारंभोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षण विभागाच्या आदेशानुसार फुले उधळून, पेन्सिली व चॉकलेट देऊन मुलांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी शाळेचे एचडीएमसी अध्यक्ष मोहन हरजी तसेच उपाध्यक्षा सुनीता जत्राटी यांच्यासह सदस्य लक्ष्मण जुई ,यल्लाप्पा हरजी, दीपक जाधव, अशोक लोहार , महेश जत्राटी, अनिल चौगुले,अशोक गिरमल, तानाजी कलखांबकर सदस्या सविता सोनजी, सुजल शिरल्याचे , दिपाली धर्मोजी , ज्योती चुनरी,पूजा लोहार, रेश्मा हुच्ची, रूपाली गुरव, सुधा गिरमल उपस्थित होते. शाळेतील शिक्षक वृंद व तसेच स्वयंपाक काकूंनी देखील मुलांचे जल्लोषाने स्वागत केले.
एकंदरीत शाळेच्या पहिल्याचं दिवशी मुलांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली. शाळेकडून झालेल्या अनोख्या स्वागतामुळे विद्यार्थ्यांसह पालकही भारावून गेले.
0 Comments