- जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांची माहिती
- आजपासून जमावबंदी व सशस्त्र जवानांचा बंदोबस्त
- विजयोत्सव, मिरवणूक, मद्यविक्री बंद
बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटक राज्यात सार्वत्रिक निवडणूक शांततेत पार पडली असून उद्या होणाऱ्या मतदानासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिल्हा मुख्य निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांनी आज पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आरपीडी महाविद्यालयातील मतमोजणी केंद्राला भेट देऊन येथील सुविधा आणि पूर्वतयारीचा आढावा घेतला. मतमोजणी केंद्रावरील निवडणूक कर्मचाऱ्यांना आज दुसऱ्या टप्प्यातील मोजणी प्रशिक्षणही देण्यात आले.
यानंतर बेळगाव शहरातील मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितेश पाटील यांनी बेळगावातील १८ विधानसभा मतदारसंघासाठी आरपीडी महाविद्यालयातील एकाच केंद्रावर मतमोजणी होणार असल्याची माहिती दिली.यावेळी ते पुढे म्हणाले, मतमोजणीसाठी ११८८ कर्मचारी आणि पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी निमलष्करीदल आणि १५०० पोलिसांची नियुक्ती करण्यात आली असून पोस्टल बॅलेटच्या मोजणीसाठी स्वतंत्र गट तयार करण्यात आला आहे. उद्या सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. प्रत्येक मतदारसंघात मोजणीच्या २२ ते २३ फेऱ्या होणार असल्याने दुपारपर्यंत मतमोजणी पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सुरक्षेच्या दृष्टीने कठोर उपायोजना राबविण्यात आल्या आहेत. तत्पूर्वी आज शुक्रवारी सायंकाळपासून आरपीडी कॉलेज सभोवतालच्या १०० मीटर परिसरात (१४४ कलम) जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. आज दि. १२ ते १४ एप्रिल रोजी सकाळी सात वाजेपर्यंत ही जमावबंदी राहणार आहे. या कालावधीत मतमोजणी अधिकारी कर्मचारी, पासधारक यांच्या व्यतिरिक्त पाच किंवा त्यापेक्षा अधिक कोणीही फिरू नये असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या म्हणाले, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आरपीडी महाविद्यालयात १५०० पोलीस कर्मचाऱ्यांसह कठोर बंदोबस्तासाठी निमलष्करी दलाच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. मतदान केंद्र परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मतमोजणी दिवशी आरपीडी मार्गावरून होणारी सर्व खाजगी वाहतूक बंद करून अन्य मार्गाने वळविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय शहरात आवश्यक त्या ठिकाणी कडे कोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी योग्य प्रकारे नियोजन केल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी दिली.
बेळगाव जिल्हा व शहर पोलीस विभागाकडून योग्य ती कार्यवाही करण्यात आली असून आज सायंकाळ पासून मद्यविक्रीस बंदी घालण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी दिली. याशिवाय १४४ कलम (जमावबंदी) ची काटेकोर अंमलबजावणी व्हावी याकरिता शहरी भागात माहिती देण्यात येणार असून मतदाना दिवशी प्रमाणेच मतमोजणी सुद्धा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्याचे त्यांनी सांगितले.
एकंदरीत जिल्हा प्रशासनाने बेळगाव येथील मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण केली असून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलानेही कंबर कसली आहे.
0 Comments