बेळगाव / प्रतिनिधी
शहरातील शिवजयंती मिरवणुकीकरिता टेंगिनकेरा गल्ली येथील राजगुरू चौक मंडळाच्या वतीने गल्लीसाठी छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या मूर्ती आणण्यात आल्या. गुरुवार दि. २५ मे रोजी या मूर्तींचा आगमन सोहळा मोठ्या थाटात पार पडला. तत्पूर्वी धर्मवीर संभाजी चौक येथून मूर्तींच्या आगमन सोहळ्याला प्रारंभ झाला.
- वातावरण भगवेमय -
ढोल-ताशा पथक, झांज पथक ,लेझिम पथक या पारंपरिक वाद्यांसह काढण्यात आलेल्या आगमन सोहळ्याच्या मिरवणुकीत जल्लोष दिसून आला. भगवे फेटे आणि टोप्या परिधान करत हातात भगवे ध्वज घेऊन मिरवणुकीत सहभागी झालेल्या युवक - युवती, पुरुष व महिलांमुळे भगवेमय वातावरण निर्माण झाले होते.
पारंपरिक कसरतींच्या सादरीकरणाने मिरवणुकीत रंगत
मल्लखांब आणि पारंपारिक कसरतींच्या प्रात्यक्षिकांनी मिरवणुकीत रंगत आणली.
संभाजी महाराज चौक येथून सुरू झालेल्या मिरवणुकीची किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, गणपत गल्ली, पांगुळ गल्ली मार्गे टेंगिनकेरा गल्लीत सांगता झाली.
अगदी पूर्वापार चालत आलेल्या परंपरेप्रमाणे अस्सल मराठमोळ्या पेहरावतील महिला मिरवणुकीत लक्षवेधी ठरल्या.
- आज महाप्रसाद आणि पोवाडा कार्यक्रम -
आज शुक्रवार दि. २६ मे रोजी सायंकाळी ७ ते १० पर्यंत गल्लीत शिवचरित्रावर आधारित पोवाडा कार्यक्रम आणि महाप्रसाद होणार आहे. तरी या पोवाडा कार्यक्रम आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अक्षय सूर्यवंशी आणि उपाध्यक्ष नागेश ताशिलदार यांच्यासह मंडळाचे सदस्य आणि कार्यकर्त्यांनी केले आहे.
0 Comments