बेळगाव / प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी आज शनिवारी मतमोजणी केंद्र आणि स्ट्राँग रूम स्थापनेसंदर्भात जागेची पाहणी केली. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह शहरातील आर.पी.डी. महाविद्यालयाला भेट देऊन स्ट्राँग रूम व मतमोजणी केंद्र उभारणीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याबरोबरचं महाविद्यालयाच्या आवारातील विविध इमारतींची पाहणी करून मागील निवडणुकीत केलेल्या व्यवस्थेचीही त्यानी माहिती घेतली.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्ट्राँग रूम, मतमोजणी कक्ष, पार्किंग व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती तयारी करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
याबाबत सर्वंकष ब्ल्यू प्रिंट तयार करून निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर कामे सुरू करावीत, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.बेळगाव शहर पोलीस आयुक्त डॉ.एम.बी.बोरलिंगय्या यांनी आवश्यक सुरक्षा उपाययोजना व पार्किंग व्यवस्थेचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असे सांगितले.
केवळ सुरक्षेबाबतच नव्हे तर वाहतुकीला अडथळा न होता पार्किंग आणि अन्य व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या शक्यतांवरही त्यांनी चर्चा केली.सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता भीमा नायक यांनी स्ट्राँग रूम व मतमोजणी केंद्र उभारण्याबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.संजीव पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
0 Comments