बेळगाव / प्रतिनिधी

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध  रक्कम आणि मद्य वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. तरीही विविध ठिकाणी ही वाहतूक सुरू असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. शनिवार दि. ८ मार्च ते आज रविवार दि. ९ मार्च रोजी दुपारपर्यंत  हिटणी, हुनशाळ (घटप्रभा) आणि यरगट्टी येथे निवडणूक अधिकारी आणि पोलिसांनी कारवाई करून  ३ लाख ५५ हजार रुपये जप्त केले. 

-हिटणी तपासणी नाक्यावर १ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त-

निपाणी जवळच संकेश्वर पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या  हिटणी येथील तपासणी नाक्यावर खाजगी कारची झडती घेण्यात आली. यावेळी कारमालक आनंद तट्टी यांच्या वाहनात एक लाखाची रक्कम आढळून आली.  याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांनी तपशील मागितल्यावर त्यांच्याकडून कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. त्यामुळे पोलीस व निवडणूक अधिकाऱ्यांनी ही रक्कम आपल्या ताब्यात घेतली आहे.

- यरगट्टी येथे १ लाख ३७ हजार जप्त-

यरगट्टी येथेही वाहनांची तपासणी करत असताना (केए ०५ डी ९३४३) क्रमांकाच्या वाहनात १ लाख ३७ हजार रु. रोख रक्कम आढळून आली. निवडणूक अधिकारी आणि पोलिसांनी चौकशी केल्यानंतर समर्पक उत्तरे न मिळाल्याने या वाहनावर कारवाई करून रक्कम जप्त करण्यात आली आहे.

- घटप्रभानजीक १ लाख १८ रु. किंमतीचा बेकायदा मद्यसाठा जप्त -

घटप्रभा नजीक हुनशाळ गावात धाड घालून केलेल्या कारवाईत  १ लाख १८ हजार रुपये किमतीचे मद्याचे ३४ बॉक्स (३०१ लि. मद्य ) जप्त करण्यात आले. याप्रकरणी कारवाई करून संबंधितांना अधिक माहितीसाठी ताब्यात घेतली आहे.

- कोगनोळी टोल नाक्यावर ५ लाख ८२ हजार जप्त -

कोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर असणाऱ्या कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यावर ५ लाख ८२ हजार ५०० रु. सापडल्याची घटना शनिवार दि. ८ रोजी ३ सुमारास घडली.

याबाबत प्राप्त माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर असणाऱ्या कोगनोळी तपासणी नाक्यावर कोल्हापूरहून गोव्याकडे जात असणाऱ्या खाजगी चारचाकी गाडीची तपासणी केली. गाडीतील संजय शामराव डाकरे यांच्याकडे  ५ लाख ८२ हजार ५०० रु. असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ रोख रक्कम ताब्यात घेऊन पंचनामा केला. गोवा फिरण्यासाठी जात असून स्वतःला खर्चासाठी रक्कम सोबत घेतली असल्याचे संजय डाकरे यांनी सांगितले.

निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ, उपनिरीक्षक कृष्णा नाईक, उपनिरीक्षक रेवांना गुरीकार, रमेश तलवार, संजय बारवाडकर, संजय खोत, महेश सांगावे, किरण पुजारी शिवानंद आदींच्या पथकाने ही कारवाई केली.