सुळगा (हिं.) / वार्ताहर
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांच्या प्रचारार्थ बुधवार दि. २६ एप्रिल रोजी सकाळी गणेशपुर भागातील ज्योतीनगर, लक्ष्मी नगर, शिवम नगर, रक्षक कॉलनी, सिंडिकेट कॉलनी, क्रांतीनगर, सरस्वतीनगर आदी भागात भव्य प्रचारफेरी काढण्यात आली.
प्रारंभी स्वातंत्र्यसैनिक व सीमा सत्याग्रही कॉ. कृष्णा मेणसे यांचा आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात केली. यावेळी निवृत्त प्राचार्य आनंद मेणसे, व्ही. एम. पाटील यांनी चौगुले यांना शुभेच्छा दिल्या.
-प्रचारफेरीचे ठिकठिकाणी स्वागत-
ठिकठिकाणी महिला व युवकांनी प्रचार फेरीचे जल्लोषी स्वागत केले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांचे सुवासिनींनी औक्षण केले. तसेच विजयासाठी त्यांना आशीर्वाद दिला. नागरिकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी एकनिष्ठ राहून मराठी भाषा व संस्कृती टिकविण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे सांगितले. प्रचार फेरीत युवकांनी दिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
एकंदरीत गणेशपुर भागातील या प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने प्रचारफेरीत सहभाग घेऊन मतदारांच्या घरोघरी भेटी घेत समितीला विजयी करण्यासाठी चौगुले यांच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याचे आवाहन केले.
या प्रचारफेरीत माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, जि. पं. माझी सदस्या माधुरी हेगडे, ग्रा. पं. अध्यक्षा प्रेमा हिरोजी, सदस्य उमेश चोपडे, जेष्ठपंच पिराजी पाटील यांच्यासह पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments