• आर. एम. चौगुले यांचे मतदारांना आवाहन
  • निलजी भागात प्रचार दौरा 
  • संपूर्ण गावात उस्फूर्त पाठिंबा 
  •  प्रचारापूर्वी झाले जल्लोषी स्वागत  

सुळगा (हिं.) / वार्ताहर  

सीमाभागात पुन्हा एकदा मराठी भाषिकांची सत्ता स्थापन करून आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला सडेतोड उत्तर देण्यासाठी समितीचा  उमेदवार विधानसभेत पाठवा, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांनी मतदारांना केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील निलजी गावात गुरुवारी झालेल्या प्रचार फेरी दरम्यान मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

प्रारंभी प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी आर. एम. चौगुले यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.

यावेळी कार्यकर्त्यांनी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो, आर. एम. चौगुले यांचा विजय असो अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. प्रचारफेरीद्वारे आर. एम. चौगुले यांनी घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली. यावेळी म. ए. समिती कार्यकर्त्यांना बहुसंख्येने प्रचार फेरीत सहभागी होण्याचे  आणि त्याचबरोबर इतरांनाही प्रचारात सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले. 

बेळगाव तालुक्याच्या ग्रामीण मतदार संघात समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांचा झंझावाती प्रचार  सुरू असून गुरुवारी कार्यकर्त्यांसमवेत निलजी गावात केलेल्या प्रचाराला संपूर्ण गावातून उत्स्फूर्त पाठिंबा लाभला.