• केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे आवाहन
  • ग्रामीण मतदारसंघातील जाहीर सभेत मतदारांना मार्गदर्शन 
  • काँग्रेस पक्षावरही केली सडकून टीका 

                                   
                                        

सुळगा (हिं.) / वार्ताहर 

कोरोना काळामध्ये देश संकटात सापडलेला असताना पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी जनतेसाठी मोफत लस उपलब्ध करून दिली. मायमाऊलींना डोक्यावर हंडा घेऊन वणवण करावी लागू नये, यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावामध्ये घरात पाणी देण्याची योजना सरकारच्या माध्यमातून राबवली जात आहे.  प्रत्येक जाती-धर्मातील व्यक्तींना चांगले जीवन जगता येण्यासाठी भाजप सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत.  आपला एक भाऊ प्रत्येक अडचणीत पाठीशी  खंबीरपणे उभा राहत असल्याने बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील महिला भगिनी नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नागेश मनोळकर यांना विजयी करतील, असा विश्वास केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी व्यक्त केला. 

हिंडलगा बॉक्साईट रोड, येथे बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार नागेश मनोळकर यांच्या प्रचारार्थ गुरुवारी आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर बेळगाव ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार संजय पाटील, बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष  धनंजय जाधव, बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार नागेश मनोळकर, ग्रामीण विभाग प्रभारी तथा ओबीसी मोर्चा सचिव कर्नाटक राज्य किरण जाधव, महिला मोर्चा अध्यक्ष ग्रामीण मंडळ भाग्यश्री कोकितकर, जिल्हा उपाध्यक्ष युवराज जाधव, उपमहापौर रेश्मा पाटील, नगरसेवक विना विजापुरे, हिंडलगा ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य तथा माजी अध्यक्ष रामचंद्र मनोळकर, एससी मोर्चा अध्यक्ष बेळगाव यल्लेश कोलकार आदि उपस्थित होते. प्रारंभी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. 

-बेळगावातील जनता डबल इंजिन सरकारला पाठींबा देणार- 

याप्रसंगी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुढे म्हणाल्या, कोरोना काळात काँग्रेसने जनतेच्या आरोग्याची काळजी केली नाही. मतदार संघात  कधी मास्क आणि सॅनिटायझरचे सुद्धा वाटप केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोफत लसीकरणाची सोय उपलब्ध उपलब्ध करून दिलेली असतानाही मतदार संघातील जनतेला लसीकरणाचे आवाहन केले  नाही.  गेली ७० वर्षात लोकांच्या घरामध्ये स्वच्छ पाणी येत नव्हते, हे प्रतिस्पर्धी उमेदवार कधी सांगणार नाहीत. मात्र केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जलजीवन योजनेच्या माध्यमातून घराघरांमध्ये पाणी पोहचवले. त्यामुळे बेळगावमधील महिलांना कुणाला मतदान करायचे हे माहीत आहे. म्हणूनच येत्या दहा तारखेला मतदानाचा पवित्र हक्क बजावताना महिला भाजपाला मतदान करतील असे त्यांनी ठामपणे सांगितले. 

   -काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर होणाऱ्या टीकेचा घेतला समाचार

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसकडून  सातत्याने होणाऱ्या टिकेचा खास शैलीत समाचार घेताना मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर जोरदार टीका केली. तर दुसरीकडे  थेट गांधी कुटुंबालाही आव्हान दिले. जर तुम्ही पंतप्रधान मोदींचे मरण चिंतत असाल, तर कर्नाटक राज्यातील महिला मोदींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत राहतील आणि या महिलांमधील अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेस पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केसालाही धक्का पोहोचवू शकत नाही असा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला. संजय पाटील आणि नागेश मनोळकर हे फक्त निमित्त आहेत. मात्र मनात पंतप्रधान नरेंद्र मोदींना विजयी करण्याचा संकल्प आपल्याला करायचा आहे असे भावनिक आवाहनही त्यांनी महिलांना केले. भारताकडे कोरोना प्रतिबंधात्मक लस तयार करण्याची क्षमता आहे. आणि ती भारतातच तयार केली जाईल, असे निर्धोकपणे सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच आज संपूर्ण देश कोरोना मुक्त झाला. भारतात तयार झालेली ही लस विदेशातही निर्यात करण्यात आली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे सर्व राष्ट्रांमध्ये भारताचा नावलौकिकही वाढला आहे. याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील पराभव काँग्रेस पक्षाला स्पष्ट दिसत आहे. म्हणूनच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे पंतप्रधान मोदींवर टीका करत आहेत, असा मिश्किल टोलाही त्यांनी हाणला.

कर्नाटक राज्यातील जनता टिपू सुलतानची जयंती साजरी करणाऱ्यांना कदापी मतदान करणार नाही. तर शिवाजी महाराजांच्या शिकवणीनुसार चालणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या मागे नक्कीच राहील. महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र आणि राज्यातील डबल इंजिन सरकारने अनेक कार्यक्रम हाती घेतले. त्यामुळे आगामी काळात देखील बेळगाव सह संपूर्ण कर्नाटक राज्याच्या विकासासाठी जनता डबल इंजिन सरकारला पूर्ण बहुमत येईल, असा विश्वास यावेळी स्मृती इराणी यांनी व्यक्त केला.

  -निवडणुकीत भाजपला बहुमत देण्याचे मतदारांना आवाहन

ही निवडणुक फक्त भारतीय जनता पक्षाच्या प्रतिष्ठेचीचं नाही तर संविधानाचे संरक्षण, मतदारसंघाची सुरक्षितता, महिलांचा सन्मान, युवा पिढीचे उज्वल भविष्य या दृष्टीने महत्त्वाची आहे. म्हणूनच या निवडणुकीत घरोघरी विकास पोहोचवायचा असेल तर येत्या दहा तारखेला मतदानाचा पवित्र हक्क बजावताना राज्यात पूर्ण बहुमतातील भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर यावे याकरिता कमळ चिन्हासमोरचे बटण दाबून भाजपला मतदान करण्याचे आवाहन करत त्यांनी आपले मनोगत पूर्ण केले.

प्रास्ताविकात बेळगाव ग्रामीण मतदार संघातील भाजपचे अधिकृत उमेदवार नागेश मनोळकर यांनी पक्षश्रेष्ठींनी विश्वास दाखवून निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्याने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेत्यांना धन्यवाद दिले.

तसेच मिळालेल्या संधीचे सोने करून मतदार संघाचा विकास करण्याची ग्वाही त्यांनी दिली. सर्व धर्मियांना सोबत घेऊन विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार आहे. ग्रामीण मतदारसंघात मूलभूत सुविधांसह आरोग्य सुविधा आणि रोजगाराच्या दृष्टीने प्रकल्प राबविण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तेव्हा येत्या दहा तारखेला मतदानाचा पवित्र हक्क बजावताना कमळ चिन्हासमोरील बटण दाबून मला अर्थात भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला बहुमताने निवडून देत विधानसभेत पाठवावे असे आवाहन त्यांनी जनतेला केले. 

यावेळी बेळगाव ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार संजय पाटील यांनी या निवडणुकीत आमिष आणि प्रलोभनाला बळी न पडता शाश्वत विकासासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले.


यानंतर महाराष्ट्रातील भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या सभेचे सूत्रसंचालन भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी केले.यावेळी मतदार संघातील भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.