• राहुल कातकरच्या कार्याची मराठा नेते विनय विलास कदम यांच्याकडून दखल
  • पाटणे फाटा ता. चंदगड तीन वर्षीय बालकाला दिले जीवदान 

सुळगा (हिं.) / वार्ताहर  

पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे खेळता खेळता ७० ते ८० फूट खोल विहिरीत पडलेल्या आयुष अनंत तुपारे या तीन वर्षीय बालकाला स्वतःचा जीव धोक्यात घालून जीवदान देणाऱ्या राहुल कातकर (वय ४०, रा.आंबेवाडी,ता. बेळगाव) या युवकाची चंदगडसह बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांमध्ये प्रशंसा होत आहे. या कार्याची मराठा नेते तथा बेळगाव ग्रामीण भाजपचे माजी अध्यक्ष विनय विलास कदम व श्री राम युवक मंडळ आंबेवाडी यांनी दखल घेतली आणि राहुल कातकर याचा समाजवीर पुरस्काराने सन्मान करून त्याचे कौतुक केले.

यावेळी बोलताना विनय कदम म्हणाले, आंबेवाडी (ता. बेळगाव) येथील राहुल कातकर या युवकाने जीव धोक्यात घालून पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे खेळता खेळता ७० ते ८० फूट विहिरीत पडलेल्या आयुष तीन वर्षीय बालकाचे प्राण वाचविल्याची बातमी सकाळी वाचली आणि मी राहुलशी संपर्क साधला. खरंच राहुलने केलेले हे कार्य  कौतुकास्पद आहे. लहान बालकाला  जीवदान दिल्याने राहुलला  परमेश्वराकडून या जन्मीच त्याचे पुण्य मिळावे अशी प्रार्थना त्यांनी केली. परमेश्वरा बरोबरच आमचेही राहुलला नेहमीच सहकार्य राहील असे सांगत राहुलच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

याप्रसंगी कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशन जनरल सेक्रेटरी राहुल भातकांडे, नेमाणी मजुकर, प्रमोद तरळे, विकास भातकांडे, प्रेम तरळे पवन आंनदाचे, सचिन शहापुरकर विजय जंगम यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.