- ग्रामीण मतदारसंघात समितीचा भगवा फडकविणार
- कार्यकर्त्यांचा निर्धार
सुळगा (हिं.) / वार्ताहर
महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांच्या प्रचारार्थ बुधवारी सायंकाळी हंगरगा, मंडोळी, सावगाव भागात प्रचार फेरी काढण्यात आली.
प्रारंभी हंगरगा गावातील मारुती मंदिरात आर. एम. चौगुले यांच्याहस्ते पूजा करून प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली.
हंगरगा येथील प्रचारफेरी दरम्यान प्रत्येक गल्लीत महिलांनी औक्षण करून चौगुले यांचे स्वागत केले. यानंतर मंडोळी व सावगाव गावात प्रचार फेरी काढण्यात आली.
या प्रचार फेरीमध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. डोक्यावर भगव्या टोप्या आणि हातात भगवे ध्वज घेऊन प्रचार फेरीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांमुळे तिन्ही गावांमध्ये भगवेमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या तिन्ही गावातून आर. एम. चौगुले यांना बहुमताने पाठिंबा देण्यात आला आहे.
दिवसेंदिवस समितीच्या ग्रामीण उमेदवारासाठी नागरिक प्रचार फेरीमध्ये मोठ्या संख्येने भाग घेऊन ग्रामीण मतदारसंघात समितीचा भगवा फडकविण्यासाठी एकवटले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
0 Comments