• पोलिसांची कारवाई ; एक जण ताब्यात

कोगनोळी / वार्ताहर 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यावर  खासगी ट्रॅव्हल्स मधून ७ लाख ५० हजार रु. रोकड जप्त करण्यात आली. शुक्रवारी रात्री १० वा. सुमारास ही  कारवाई करण्यात आली. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून एम. एन. उदय शंकर असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी तपासणी नाक्यावर पुण्याहून  चिक्क मंगळूर कडे  जात असणाऱ्या गणेश ट्रॅव्हल्स बसची तपासणी करण्यात आली. यावेळी बस मध्ये असणाऱ्या  एम. एन. उदयशंकर यांच्याकडे ७ लाख ५० हजार रुपये असल्याचे निदर्शनास आले. तात्काळ रोख रक्कम पोलिसांनी ताब्यात घेऊन पंचनामा केला.

निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकाचे  उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ, उपनिरीक्षक कृष्णा नाईक, उपनिरीक्षक रेवांना गुरीकार, शिवानंद चिकमट, शिवप्रसाद किवडनावर, अमर चंदनशिव, संदीप गाडीवडर आदी कर्मचाऱ्यांचा या कारवाईत सहभाग होता.