- बहाद्दरवाडी, कर्ले, जानेवाडी, बामणवाडी गावातील महिला कामगारांची मागणी
- 'मजदूर नवनिर्माण संघाच्या' वतीने किणये ग्रा. पं. विरुद्ध ता. पं. कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार
कल्लेहोळ / गोपाळ पाटील
मनरेगा कायद्याप्रमाणे योग्यप्रकारे रोजगाराचे काम मिळावे यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी किणये ग्रामपंचायतक्षेत्रातील बहाद्दरवाडी, कर्ले, जानेवाडी व बामणवाडी गावातील मनरेगा अंतर्गत रोजगाराचे काम मागणाऱ्या महिलांनी आज 'मजदूर नवनिर्माण संघाच्या' वतीने बेळगाव ता. पं. कार्यकारी अधिकाऱ्यांकडे किणये ग्रामपंचायती विरूध्द तक्रार केली.
किणये ग्रामपंचायतीमधील बहाद्दरवाडी, कर्ले, जानेवाडी व बामणवाडी गावातील मनरेगा कामगारांना किणये ग्रा. पं. कडून गेली कित्येक वर्षे मनरेगा कायद्याप्रमाणे वर्षाला १०० दिवस काम याप्रमाणे कधीच रोजगाराचे काम मिळालेले नाही. येथील काही महिलांनी आपल्याला रोजगाराचे काम मिळावे म्हणून किणये ग्रामपंचायतीकडे अनेकदा खेपा मारल्या, पण गरीब कष्टकरी महिलांच्या समस्या ऐकून घेण्यास किणये ग्रा. पं. कडे वेळचं नाही. ग्रा. पं. मधून काही गावातील महिलांना जाॅबकार्ड मिळविण्यासाठी २ वर्षे वाट बघावी लागली, या गावांतून वर्षातून मोजकेच दिवस आणि तेही मोजक्याच कामगारांना काम मिळत होते. संपूर्ण गावकऱ्यांना कधीच एकत्रित मनरेगा कायद्यानुसार योग्य प्रकारे काम मिळालेले नाही. त्यामुळे ग्रा. पं. च्या वेळकाढू कृतीला कंटाळून येथील रोजगाराला जाऊ इच्छिणाऱ्या गरीब कष्टकरी महिलांनी 'मजदूर नवनिर्माण संघाच्या' राहुल पाटील यांच्याशी संपर्क साधला व आपल्या समस्या त्यांना सांगितल्या. समस्या ऐकून घेतल्यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गरज लागेल तेव्हा येथील गावागावात जाऊन बैठका घेऊन महिलांना मनरेगा कायद्याची माहिती दिली व त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली येथील महिलांना आता थोडेतरी रोजगाराचे काम मिळत आहे. तरी अजूनही काही महिलांना यापूर्वी केलेल्या कामाची मजुरी मिळालेली नाही.
यासंदर्भात पुढील वर्षी (सन २०२३ -२४) आपल्याला योग्य प्रकारे काम मिळावे म्हणून 'मजदूर नवनिर्माण संघाच्या' माध्यमातून तालुका पंचायत अधिकाऱ्यांची भेट घेत कामगारांनी आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. यावेळी आलेल्या महिलांकडून तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी राजेश दनवाड यांनी निवेदन स्वीकारले. याप्रसंगी मजदूर नवनिर्माण संघाचे बहाद्दरवाडी , जानेवाडी, कर्ले व बामणवाडी येथील कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments