• २५ किलो मटणासह भांडीही जप्त
  • शेकडो लोकांना मटण जेवण संबंधितांवर गुन्हा दाखल 

खानापूर / प्रतिनिधी 

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली नसली तरीही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. असे असताना खानापूर येथील लैला शुगर कारखान्यात मटणाची मेजवानी दिली जात असल्याची माहिती मिळताच, खानापूर तालुका प्रशासनाच्या विविध खात्यातील अधिकाऱ्यांनी धाड घालून तयार केलेल्या २५ किलो मटणासह भांडीही जप्त केली. याप्रकरणी संबंधितावर गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी प्रसिद्धीसाठी दिली आहे.

रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार खानापूर-पारीश्वाड रस्त्यालगत असलेल्या बलोगा गावातील लैला शुगर कारखान्याच्या गोदामामध्ये लोकांना मांसाहारी जेवण देत असल्याची माहिती मिळाली होती.

त्या माहितीनुसार कार्यरत असलेले एफएसटी अधिकारी, AEE Hescom, CDPO, BCM officer व AD Agriculture व पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह त्यांचे सहकारी तसेच तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्यांनी मिळून तीन वाहनांमधून जात लैला शुगर कारखान्याच्या गोडाऊनमध्ये पाहिले असता लोकांना जेवण देत असल्याचे निदर्शनास आले.

याचे व्हिडिओ चित्रीकरण करून  कारखान्याचे  कार्यकारी संचालक सदानंद पाटील यांना बोलाविण्यात आले. जेवणाबद्दल चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, कारखान्याला ऊस पाठविलेल्या शेतकऱ्यांना जेवण देत आहे. तरीही त्या ठिकाणी शेकडोजण जेवत होते. तेथे तयार केलेले २५ किलो मटण, मटणाच्या भांड्या सह साहित्य जप्त करून ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील चौकशी खानापूर येथे सुरू असल्याची माहिती तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी प्रसिद्धीसाठी दिली आहे.