- बेळगावचा उल्लेख बेळगावी केल्याने मराठी भाषिकांनी केला निषेध
- व्हिडीओ व्हायरल होताच मागितली सीमावासियांची माफी
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव येथील राजहंसगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या अनावरण प्रसंगी उपस्थित राहण्याविषयी मला विनंती करण्यात आली होती परंतु सीमा भागातील माझ्या अनेक मराठी बांधवांनी एकूण पार्श्वभूमीची कल्पना दिली. आणि तमाम सीमावासीय मराठी बांधवांच्या भावनांचा आदर करून मी सदर कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही ! मी सदैव आपल्या सोबत होतो, आहे व राहीन! अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे.
राजहंसगड येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या अनावरण सोहळ्यावरून श्रेयवादाचे राजकारण चांगलेच रंगले आहे.
गुरुवारी (२ मार्च) रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्याहस्ते राजहंसगडावरील छ. शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीचा अनावरण सोहळा पार पडला असताना बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दि. ५ मार्च रोजी या भव्य मूर्तीचा अनावरण सोहळा पुन्हा आयोजित करण्याचा निर्णय राजहंसगड ग्रामस्थांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या अनावरण कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे उपस्थित राहणार होते. याबाबतचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडिओत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बेळगावचा उल्लेख बेळगावी असा केल्याने मराठी भाषिकांनी निषेध व्यक्त करून तीव्र संताप व्यक्त केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सीमाप्रश्नी नेहमी आक्रमक व अग्रेसर असतात. तेव्हा अमोल कोल्हे यांनी प्रत्येक ठिकाणी अभिनेत्याच्या वलयातून बाहेर पडून पक्षाच्या भूमिकेशी एकरूप झाले पाहिजे तसेच त्यांनी स्वतः अनेकदा बेळगाव प्रश्नावर आवाज उठवला आहे ; पण व्हिडिओ ते बेळगावला बेळगावी असे संबोधून आपल्या सीमाप्रश्नी
योगदानावर पाणी तर फिरवत आहेतच; शिवाय बेळगावच्या मराठी जनतेच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. तेव्हा अमोल कोल्हे यांनी बेळगावकरांच्या भावनांचा नक्की विचार करावा अशा प्रतिक्रिया मराठी भाषेतून व्यक्त होत्या.
त्यामुळे मराठी भाषिकांच्या भावनांचा विचार करून मूर्ती अनावरण सोहळ्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे.
0 Comments