• १५ टक्के वेतन वाढ कर्मचाऱ्यांना अमान्य 
  • २१ मार्चपासून संपावर जाण्याचा इशारा 

कर्नाटक : विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य परिवहन कर्मचारी संघटनेने २१ मार्चपासून  राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे गुढीपाडव्या वेळी प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (कर्मचाऱ्यांच्या) वेतन वाढीच्या मागणीला राज्य सरकारने प्रतिसाद दिला आहे. परिवहन कर्मचाऱ्यांना १५ टक्के वेतन वाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. १ एप्रिल पासून वेतनवाढ लागू करण्यात येणार आहे. यासंबंधीची घोषणा मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी गुरुवारी केली.

मात्र परिवहन मंडळाचे कर्मचारी १५ टक्के वेतन वाढीवर संतुष्ट नाहीत. त्यांनी २४ टक्के वाढीची मागणी केली असून, ती मान्य न झाल्यास  २१ मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार कायम ठेवला आहे.  परिवहन मंत्री बी. श्रीरामुलू यांनी परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनात १५ टक्के वाढ देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. मागील २७ वर्षांतील सर्वाधिक वेतनवाढ आता आपल्या सरकारने दिली आहे. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर अंदाजे ५५० कोटी रुपये अतिरिक्त भर पडणार आहे. राज्यातील चार परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल.

तथापि, १५ टक्के वेतन वाढ देण्याची घोषणा झाली तरी संप मागे घेणे विषयी परिवहन कर्मचारी संघटनेने अद्याप घोषणा केलेली नाही. परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांना गेल्या पाच वर्षात मूळ वेतनात कोणत्याच प्रकारची वाढ मिळालेली नाही. महागाई मात्र दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यासाठी मागणीप्रमाणे मूळ वेतनातही वाढ होणे गरजेचे आहे. या भूमिकेवर परिवहन मंडळाचे कर्मचारी कायम आहेत. २१ मार्च रोजी सकाळी ६ असून संपाला प्रारंभ होणार असल्याची माहिती राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनंत सुब्बाराव यांनी  दिली आहे.