बेळगाव / प्रतिनिधी 

स्विमर्स क्लब बेळगाव आणि एक्वेरियस क्लब बेळगावची आघाडीची दिव्यांग जलतरणपटू सिमरन गोंडाळकर हिची येत्या 9 ते 12 मार्च 2023 दरम्यान इटलीतील लिग्नांनो सॅब्बाइडोरा (उदीन) येथे आयोजित पॅरा स्विमिंग वर्ल्ड सिरीज या दिव्यांगांसाठीच्या जागतिक पातळीवरील जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत संपूर्ण भारतातून निवडक 8 दिव्यांग जलतरणपटू भाग घेत आहेत.
सदर जागतिक स्पर्धेच्या बुटक्या श्रेणी मधील 50 मी. फ्रीस्टाइल, 50 मी. बटरफ्लाय स्ट्रोक, 100 मी. ब्रेस्ट स्ट्रोक आणि 100 मी. बॅक स्ट्रोक या शर्यतींमध्ये बेळगावच्या सिमरन गोंडाळकर हिचा सहभाग असणार आहे. सिमरन ही अतिशय प्रामाणिकपणे खडतर मेहनत घेणारी क्रीडापटू असून ती केएलई संस्थेच्या लिंगराज कॉलेजमध्ये बी.कॉम. तिसऱ्या वर्षात शिकत आहे. आत्तापर्यंत तिने जलतरणामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील 3 पदकांसह राष्ट्रीय पातळीवरील 20 पदके संपादन केली आहेत.
खेलो इंडिया पुढाकारांतर्गत भारत सरकारने सिमरन गोंडाळकर हिला दत्तक घेतले असून तिला गांधीनगर, गुजरात येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) क्रीडा संकुलामध्ये जलतरणाचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्याचप्रमाणे बेळगावातील सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावात जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतकर आणि डॉ. हरप्रीत कौर (स्पोर्ट्स मेडिसिन) यांच्या मार्गदर्शनाखाली ती पोहण्याचा सराव करते. सिमरन गोंडाळकर हिला आई-वडिलांसह केएलई सोसायटीचे चेअरमन डाॅ. प्रभाकर कोरे, जयभारत फाउंडेशनचे अध्यक्ष जयंत हुंबरवाडी, एसएलके ग्रुप बेंगलोर, राम मल्ल्या, रो. अविनाश पोतदार, माणिक कपाडिया, लता कित्तूर, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडुलकर आणि इतरांचे प्रोत्साहन लाभत आहे. उपरोक्त जागतिक पातळीवरील निवडीबद्दल सिमरन गोंडाळकर हिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.