![]() |
(फोटो आणि व्हिडिओ सौजन्य : श्री.अमृत बिर्जे) |
बेळगाव / प्रतिनिधी
'बुरा ना मानो होली है' असे म्हणत परंपरेप्रमाणे शहरवासियांनी रंगोत्सव उत्साहात साजरा केला. बेळगाव शहर आणि उपनगरी भागात मंगळवारी रंगोत्सवाचा जल्लोषी सोहळा रंगला. युवावर्गासह महिला व अबाल वृद्धांनी सहभागी होत रंगपंचमीचा आनंद लुटला.
यावेळी ठिकठिकाणी नागरिकांनी रंगोत्सवाचा आनंद लुटण्याकरिता शहर परिसरात गर्दी केली होती. एकमेकांना रंग लावत सर्वांनीच आनंद द्विगुणीत केला. पुरुषांप्रमाणेच महिलांनी रंगोत्सवात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
-डीजेच्या तालावर थिरकली तरुणाई-
शहरातील चव्हाट गल्ली, खडक गल्ली, कंग्राळ गल्ली, गोंधळी गल्ली, गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, कडोलकर गल्ली , मारुती गल्ली, ताशिलदार गल्ली, फुलबाग गल्ली, टिळकचौक, रामलिंगखिंड गल्ली,कपिलेश्वर ओव्हर ब्रिज, शास्रीनगर, कित्तूर चन्नम्मा चौक यासह शहरातील प्रमुख मार्गांवर तसेच चौका चौकात रंगोत्सवाकरिता वॉटरशॉवर लावण्यात आले होते. यावेळी सप्तरंगांची उधळण करत युवावर्गाने डीजेच्या तालावर नृत्याचा आनंद लुटल्याचे दिसून आले.
-मुखवट्यांची क्रेझ-
यंदाच्या रंगोत्सवात विविध मुखवट्यांची क्रेझ होती. रंगात न्हाऊन निघालेले तरुण वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे परिधान करून शहरात फिरताना पाहायला मिळाले.
-पांगुळ गल्लीतील अश्वत्थामा मंदिरासमोर परंपरेप्रमाणे लोटांगणे-
एकंदरीत शहरात आणि उपनगरी भागात पारंपारिक पद्धतीने रंगोत्सव साजरा करण्याची प्रथा आजही जोपासण्यात येत आहे. त्यानुसार सणाचे पावित्र्य अबाधित राखून गत दोन वर्षात कोरोना निर्बंधांमुळे काहीसा बेरंग झालेला रंगोत्सव यंदा शांततेत पार पडला. दरवर्षी प्रशासनाकडून दुपारी १२ ते १ वा. पर्यंत रंगोत्सव साजरा करण्यास परवानगी दिली जाते. मात्र यंदा दुपारी ३ वा. पर्यंत शहरात रंगोत्सवाचा सोहळा रंगला. यानिमित्ताने गत दोन वर्षातील रंगोत्सवाची कसर शहरवासियांनी भरून काढली.
-शहर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त-
रंगपंचमी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून रंगाचा बेरंग होऊ नये, याकरिता शहर पोलीस प्रशासनाने प्रमुख मार्गांवर व संवेदनशील ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. यावेळी हुल्लडबाजी करणाऱ्यांवर करडी नजर ठेवून रंगोत्सवाला गालबोट लागू नये याकरिता पोलिसांनी खबरदारी घेतली होती.
-सामूहिक होली मिलन कार्यक्रम आयोजनात राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा-
कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी सण उत्सवाच्या निमित्ताने राजकीय पक्षांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. यंदाच्या रंगोत्सवात याची प्रकर्षाने जाणीव झाली. प्रतिवर्षाप्रमाणे भाजप तर्फे लेले मैदानावर सामूहिक होली मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथे युवा वर्गांसह ज्येष्ठ नागरिकांनी डॉल्बीच्या तालावर नृत्याचा आनंद घेत रंगोत्सवाचा आनंद लुटला. तर भाजप प्रमाणे ही काँग्रेसने हम भी किसी से कम नही हे दाखवून देत टिळकवाडी शुक्रवार पेठ येथे खास महिलांसाठी सामूहिक होली मिलन कार्यक्रम आयोजित केला होता. नेहमीच घर कामात व्यस्त असणाऱ्या महिलांनी आज वेळात वेळ काढून या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला.
-तालुक्यातील काही गावात उत्साही रंगपंचमी-
बेळगाव तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये धुलीवंदननंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा आहे. मात्र तालुक्याच्या पश्चिम भागातील सुळगा (उ.), हिंडलगा, बेनकनहळळी गावांमध्ये होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुलीवंदन दिवशीच रंगपंचमी साजरी केली जाते. त्या प्रथेनुसार आज सुळगा (उ.), हिंडलगा आणि बेनकनहळळी येथेही उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली.
सकाळपासूनच गावातील गल्लोगल्ली रंगपंचमीसाठी बालचमूंची लगबग दिसून आली. पिचकारी, रंगाचे फुगे घेऊन सर्वजण एकत्र आले एकमेकांना रंग लावून सप्तरंगात न्हाऊन निघाले.
0 Comments