- सर्व परीक्षा केंद्रांवर असणार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
बेळगाव / प्रतिनिधी
दहावी व बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर अर्धा तास अगोदर प्रवेश दिला जाणार असल्याने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सोयीस्कर होणार आहे. ९ मार्च पासून बारावी तर २९ मार्च पासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. या परीक्षेसाठी शिक्षण खात्याने तयारी सुरू केली असून मुख्य पर्यवेक्षकांना परीक्षेसंदर्भात आवश्यक सूचना करण्यात आल्या आहेत. सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. मात्र सर्व केंद्रांवर विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्याच्या अगोदर अर्धा तास उपस्थित राहण्याची संधी दिली जाणार आहे.
मात्र पालक किंवा इतर अनोळखी व्यक्तीला परीक्षा केंद्रावर सोडले जाणार नाही असे शिक्षण खात्या तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रांवर १४४ कलम लागू असणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्राच्या 200 मी. अंतरावर जमाबंदी लागू असणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांना शांततेत परीक्षा देण्यास मदत होणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी ११ विभाग तयार करण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक तालुक्यासाठी भरारी पथक असणार आहे. परीक्षा काळात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये यासाठी शिक्षण खात्याने अधिक काळजी घेण्याची सूचना केंद्रप्रमुखांना केली आहे.
0 Comments