• सीसीबीचे सहाय्यक पोलीस आयुक्त एन. व्ही. बरमनी यांच्या मार्गदर्शनाखाली टाकला छापा 

हुबळी / वार्ताहर 

कर्नाटकातील लोकायुक्त विभागातील पोलिसांनी घातलेल्या छाप्यात आमदार माडाळ विरुपाक्षप्पा यांच्या मुलाजवळ ८ कोटी रुपये आढळून आले आहेत. या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू असताना हुबळीतील एका उद्योजकाच्या निवासस्थानावर केंद्रीय गुन्हे शाखेच्या (सीसीबी) पोलिसांनी छापा टाकला. या उद्योजकाच्या निवासस्थानी तीन कोटींचे घबाड सापडले असून सदर रक्कम जप्त करण्यात आली आहे. हुबळीतील भवानीनगर येथील साई गार्डन मध्ये असलेल्या रमेश बोनगेरी यांच्या निवासस्थानावर हुबळी - धारवाड सीसीबीचे सहाय्यक पोलीस आयुक्त एन. व्ही. बरमनी यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी रमेश यांच्या निवासस्थानी ५०० च्या नोटा असणारे एकूण ३ कोटी रुपये आढळून आले. या रकमी संबंधित कोणतेही कागदपत्रे रमेश यांनी तपास अधिकाऱ्यांकडे सादर केली नाहीत. त्यामुळे ही रक्कम जप्त करण्यात आली आहे.

याप्रकरणी होळीच्या अशोक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक एस.के.पट्टणकुडे यांनी प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. ३ कोटी रक्कम कुठून आली? इतकी रक्कम जमा करून ठेवणे मागचे कारण काय?  याचा तपास सुरू आहे. शिवाय अधिक तपासासाठी प्राप्तिकर विभागालाही या विषयी माहिती देण्यात आली आहे. सदर कारवाईची दखल घेत हुबळी - धारवाड पोलीस आयुक्त रमण गुप्ता यांनी सीसीबीचे सहाय्यक पोलीस आयुक्त एन. व्ही. बरमनी, आर्थिक गुन्हे विभागाचे विशेष तपास पथकाचे सहाय्यक उपनिरीक्षक  बी.एन.लंगोटी, बसवराज बेळगावी, एफ. बी. कुरी, राजू बिष्टडेर, संतोष इच्चगी आणि पीसी विद्या यांचे अभिनंदन केले आहे.  तसेच या पथकाला २५,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.